विज अनुदान देण्यासाठी उर्जा मंत्रीच हतबल?
नागपूर दि.७
मनात इच्छा असूनही विदर्भातील उद्योजकांना वीज
अनुदान देऊ शकात नाही, यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मात्र अर्थ
विभागाकडून निधी मिळत नाही. त्यामुळे आपण हतबल असल्याची प्रतिक्रिया राज्याचे
ऊर्जामंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राउत यानी दिली आहे.
उद्योगांना चालना मिळावी म्हणून
तत्कालीन सरकारने विदर्भ आणि मराठवाड्यातील उद्योगांना वीजबिलांत अनुदान जाहीर केले होते. त्यामुळे या
भागातील उद्योगांना दिलासा मिळाला होता. महाराष्ट्रातील वीज दराबाबत त्या वेळी
मोठे आंदोलन झाले होते. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील उद्योगाचे वीज दर
खूप जास्त असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली होती. या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने उद्योगांना दिलासा मिळावा
तसेच या भागात उद्योग वाढीस लागावे म्हणून वीजबिलासाठी अनुदानाची घोषणा केली होती.
मात्र, हे अनुदान मिळत नसल्यामुळे विदर्भ इंडस्ट्रिज
असोसिएशनच्या (व्हीआयए) नेतृत्वात उद्योजकांनी ऊर्जामंत्र्यांची भेट घेतली.
भेटीदरम्यान जानेवारी २०२२ च्या वीज बिलात अनुदानाचा लाभ मिळालेला नाही. अनुदान
योजना २०२४ पर्यंत कार्यान्वित राहण्याची तरतूद आहे. तरीदेखील अनुदान थांबले आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले. त्यामुळे
उद्योजकांमध्ये निराशेचे वातावरण आहे. तसेच अनुदान मिळत नसल्याने आर्थिक भरदेखील
सहन करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यावर ऊर्जामंत्र्यांनी उत्तर देत
अनुदानासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न सुरु आहेत. परंतु, निधी मिळत नसल्याने योजनेचा लाभ देण्यास विलंब
होत आहे. लवकरच हा मुद्दा अर्थ विभागाच्या सचिवांकडे मांडण्यात येईल, असे आश्वासन दिले. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष
सुरेश राठी, माजी अध्यक्ष प्रवीण
तापडिया, सचिव गौरव सारडा, सीएसआर फोरमचे अध्यक्ष गिरीधारी मंत्री, प्रफुल्ल दोशी, माजी सहसचिव पंकज बक्षी इत्यादी उपस्थित होते.