Monday, August 25, 2025

विश्वासार्ह बातम्या देणाऱ्या पोर्टल व यु ट्यूब चॅनलला राज्यस्तरीय मेळाव्यात सन्मानित करणार : एस. एम. देशमुख पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची बैठक

विश्वासार्ह बातम्या देणाऱ्या पोर्टल व यु ट्यूब चॅनलला राज्यस्तरीय मेळाव्यात सन्मानित करणार : एस. एम. देशमुख 


पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारिणीची बैठक 




पुणे :

      इलेक्ट्रॉनिक मिडिया पेक्षा डिजिटल मीडियावर आलेल्या बातम्यांचे वाचक व व्हिवर्स वाढतं आहे. त्यामुळे डिजिटल मीडियाची विश्वासार्हता ही आता वाढतं आहे. राज्याभरातील डिजिटल मिडियामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांचे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेकडून 'डिजिटल मिडिया परिषदे'च्या माध्यमातून संघटन केले आहे. पुढील काळात विश्वासार्ह बातम्या देणाऱ्या पोर्टल व यु ट्यूब चॅनलला राज्यस्तरीय मेळाव्यात सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा एस. एम. देशमुख यांनी केली. 



    अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारिणी सदस्यांची बैठक पुणे शहरात संपन्न झाली. पुणे जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील ७० प्रमुख सदस्यांच्या उपस्थित महत्वाच्या विषयांवर साधक बाधक चर्चा झाली. या बैठकीला अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी मार्गदर्शन केले. 



     पुणे शहरातील वानवडी येथिल जांभुळकर गार्डन येथे पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या बैठकीत पुणे महानगर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रमोद गव्हाणे यांची निवड जाहीर करण्यात आली. तसेच पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी प्रज्ञा आबनावे यांची नियुक्ती एस.एम.देशमुख यांनी केली. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद माझिरे यांनी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद व पुणे जिल्हा पत्रकार संघाशी आपला संघ सल्लंगन होत असल्याचे जाहीर केले. 



    बैठकीतील परिषदेचे विश्वस्त शरद पाबळे, पुणे विभागीय उपाध्यक्ष गणेश मोकाशी, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष रमेश निकाळजे, हणुमंत देवकर, चिंतामणी क्षिरसागर, अनिल वडगूळे, संजय बारहाते, विनोद माझिरे, विनय सोनवणे, रवी पाटील, रविंद्र वाळके, ॲड. संजय पाटील यांनी सुचेना मांडत आपले मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर मुख्य विश्वस्त एस एम देशमुख, विश्वस्त शरद पाबळे, उपाध्यक्ष गणेश मोकाशी, परिषद प्रतिनिधी एम.जी. शेलार, राज्य सहप्रसिद्धी प्रमुख भरत निगडे, जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा श्रावणी कामत, कार्यालयीन सचिव जिवन शेंडकर उपस्थित होते. 



      बैठकिचे प्रास्ताविक व इतिवृत्त वाचन पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांनी केले. बैठकीतील उपस्थितांचे स्वागत व सुत्रसंचलन मराठी पत्रकार परिषदेचे सहप्रसिद्धी प्रमुख भरत निगडे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार एम. जी. शेलार यांनी मानले. बैठकीचे यशस्वी नियोजन जिल्हा संघटक सुनील वाळूंज व प्रमोद गव्हाणे यांनी केले. 

Friday, August 22, 2025

पुरंदर किल्ल्याच्या मार्गावर दरड कोसळली; रस्ता चिखलमय, पर्यटकांसाठी धोका वाढला

 पुरंदर किल्ल्याच्या मार्गावर दरड कोसळली; रस्ता चिखलमय, पर्यटकांसाठी धोका वाढला



पुरंदर – छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या ऐतिहासिक पुरंदर किल्ल्यावर जाणाऱ्या रस्त्यावर शनिवारी रात्री मोठी दरड कोसळली. या दरडीमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल आणि राडारोडा साचला असून, मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक ठरला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.


गेल्या चार दिवसांपासून पुरंदर परिसरात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. सततच्या पावसामुळे डोंगराळ भागातील मातीची पकड सैल झाल्याने दरडी कोसळण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. शनिवारी रात्री किल्ल्याच्या मार्गावरील तिसऱ्या टप्प्यात दरड कोसळली. रात्रीच्या वेळी ही घटना घडल्याने मोठा अपघात टळला असला तरी सकाळी किल्ल्यावर जाणाऱ्या स्थानिकांना रस्त्यावरील चिखल आणि दगडांचा प्रचंड पसारा दिसून आला. त्यांनी तातडीने याची माहिती माध्यमांना दिली.


या घटनेचे व्हिडिओ व छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत असून, पर्यटक आणि शिवभक्तांमध्ये चिंता पसरली आहे. पुरंदर किल्ला हा सध्या लष्कराच्या ताब्यात असून, दररोज हजारो शिवभक्त, इतिहासप्रेमी आणि पर्यटक किल्ल्याला भेट देत असतात. त्यामुळे अशा दरडीच्या घटनांमुळे त्यांचा प्रवास धोकादायक ठरत आहे.


प्रशासनाकडून मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. रस्त्याची साफसफाई करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत का, याबाबतही संभ्रम कायम आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून रस्ता सुरक्षित करण्याची मागणी केली आहे.


सध्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल आणि राडारोडा असल्याने पर्यटकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे. सततच्या पावसामुळे पुढील काही दिवस दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


Monday, August 18, 2025

वीर धरणाचा विसर्ग वाढवला निरा नदिच्या पात्रात विक्रमी पाणी. निरा खोऱ्यातील धरणात ९६.७६ टक्के पाणीसाठा भाटघर १०० टक्के, निरा देवघर ९८.२८ टक्के, गुंजवणी ७८.६२ टक्के तर वीर ९३.९० टक्के भरले.

 वीर धरणाचा विसर्ग वाढवला 

निरा नदिच्या पात्रात विक्रमी पाणी. 


निरा खोऱ्यातील धरणात ९६.७६ टक्के पाणीसाठा भाटघर १०० टक्के, निरा देवघर ९८.२८ टक्के, गुंजवणी ७८.६२ टक्के तर वीर ९३.९० टक्के भरले. 



पुरंदर :

       गेली दोन दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे निरा नदिच्या पाणलोट क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली आहे. काल रविवारी निरा देवघर व भाटघर धराणत मोठ्याप्रमाणात पाणी वाढल्याने या दोन्ही धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्याचा परिणाम वीर धरणाच्या पाणीसाठा वाढला. त्यामुळे सोमवारी सकाळी अकरा वाजता वीर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. वेळोवेळी या निसर्गात वाढ करत रात्री दहा नंतर तब्बल ३३ हजार ५५२ क्युसेक्सने विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे निरा नदी दुथडी भरून वाहत आहे.


      वीर धरण पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान वाढल्याने आज सोमवारी दि.१८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता १ हजार ८०० क्युसेक्सने सुरू करण्यात आला होता. तो दुपारी १२ वाजता वाढवून ६ हजार २३८ क्युसेक्सने करण्यात आला. सायंकाळी ६ वाजता पुन्हा वाढवून १० हजार ८०० क्युसेक्सने,  रात्री ८ वाजता २४ हजार ४३५ क्युसेक्सने तर आता रात्री १० वाजता विसर्ग वाढवून विक्रमी ३३ हजार ५५२ क्युसेक्सने सुरू झाला आहे. 


   ४८ हजार ३२९ टिएमसी क्षमता असलेल्या निरा खोऱ्यातील चार धरणांमध्ये सोमवारी सायंकाळी ४६ हजार ३९१ टिएमसी पाणीसाठा म्हणजे ९५.९९ टक्के झाला आहे. भाटघर धरण १०० टक्के भरले असुन १७ हजार ०१४ क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे. निरा देवघर धरण ९८.२८ टक्के भरले असून ९ हजार ५२० क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे. गुंजवणी धरण ७८.६२ टक्के भरले असून विसर्ग सुरू नाही. तर वीर धरण ९३.९० टक्के भरले असून ३३ हजार ५५२ क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 


       निरा नदीच्या दोन्ही तिरावरील सर्वांनी याबाबत सावधानता बाळगावी. पाण्याची आवक व पावसाचे प्रमाण लक्षात घेता नदीपात्रातील विसर्गात वाढ होण्याची शक्यता असल्याचा इशारा कार्यकारी अभियंता, निरा उजवा कालवा विभाग यांनी दिला आहे.

Saturday, August 16, 2025

महाराष्ट्राला मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाला सामोरे जावे लागणार जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

 महाराष्ट्राला मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाला सामोरे जावे लागणार 

 जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा 



बारामती ( पुणे)


   महाराष्ट्राला पुढील काळात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा ओबीसी देते लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केले आहे या माणसाला संविधान कळत नाही. केवळ दादागिरीच्या जोरावर आरक्षण मिळत नाही. संविधानानुसार आरक्षण मिळतं. मात्र जरांगे मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटू पाहत आहेत. त्यामुळे पुढील काळात असा संघर्ष पाहायला मिळू शकतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सावध राहावं असा इशारा हाके यांनी दिला आहे.



  लक्ष्मण हाके हे शनिवारी रात्री पुरंदर तालुक्यातील निरा येथे आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. हाके यांनी यावेळी अजित पवार, शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यावर टीका केली. पवार कुटुंबीय म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आहे. असं त्यांनी म्हटलं आहे तर अजित पवार हे ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर, भांडवलदार,कारखानदार यांचे नेते असल्याचे म्हणत ते जातीयवाद करत असल्याचा देखील आरोप हाके यांनी अजित पवार यांच्यावर केला आहे. तर खासदार सुप्रिया सुळे या केवळ वडिलांच्या मायलेज वर निवडून येतात. त्यांचं संसदेत काय काम आहे? म्हणून त्यांना आदर्श संसद रत्न पुरस्कार मिळतो. असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी समाजातल्या तळागाळातील लोकांचे प्रश्न कधी संसदेत मांडले आहेत का? त्याच्यावर कधी आवाज उठवला आहे का? असा प्रश्न देखील हाके यांनी उपस्थित केला आहे.



 मंडल यात्रेवरही टीका 


 शरद पवार यांनी नागपूरमधून काढलेल्या मंडल यात्रेवर देखील लक्ष्मण हाके यांनी टीका केली आहे. झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण ओबीसी समाज त्यांच्यापासून दूर गेल्याची जाणीव शरद पवार यांना झाली आहे आणि त्यामुळेच पुन्हा एकदा ओबीसी समाज आपल्या बाजूला वळवण्यासाठी शरद पवारांचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र यापुढे ओबीसी समाज शरद पवार यांच्या या प्रयत्नांना भुलणार नसल्याचे देखील हाके यांनी म्हटले आहे. शरद पवारांची ही भूमिका ओबीसी समाजाला अजिबात आवडलेले नाही. शरद पवार हे दुतोंडी मांडुळासारखे वागतात. शरद पवार यांनीच महाराष्ट्र मधील ओबीसीचे आरक्षण संपवल आहे. त्यांनीच मनोज जरांगे यांना रसद पुरवली आहे. शरद पवार यांनी :फुले, शाहू, आंबेडकरांचे' नाव घेऊन ओबीसींचा आरक्षण बुडवले असल्याच हाके यांनी म्हटलं आहे. ओबीसी समाज महायुतीच्या बाजूला गेला आहे. याच शल्य शरद पवारांना आहे. आणि म्हणून ते दुतोंडी वागत आहेत. एका बाजूला मंडल यात्रा काढतायेत आणि दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे यांना मदत करत आहेत.




 अजित पवार हे जातीवादी नेते 


  सत्तेत असलेल्या अजित पवार यांच्यावर टीका करण्यासंदर्भात प्रश्न लक्ष्मण हाके यांना विचारण्यात आला . यावेळी ते म्हणाले की, अजितदादा पवार यांच्यावर टीका करण्याचं कारण असं की, अजितदादा पवार हे जातीयवादी नेते आहेत. अजितदादा पवार यांचा महाज्योती संदर्भातील सामाजिक दुजाभाव मी वारंवार महाराष्ट्राला सांगितला आहे. 

 काल परवा अजितदादा पवार यांनी एक जाहीर स्टेटमेंट केलं की तुम्ही गोधड्या वाळत घालता.? पण बारामती परिसरामध्ये आजही सर्वसामान्य लोक आहेत. वेगवेगळ्या जाती धर्मातील लोक आहेत आणि त्यांची परिस्थिती हलकीची आहे. त्यामुळे त्यांना गोधड्या वापराव्या लागतात..अजित दादा पवार हे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाला न शोभणारे व्यक्ती आहेत. त्यांना सामाजिक न्याय काहीही माहित नाही. गरिबांबद्दल भटक्यांबद्दल कसं बोलावं हे त्यांना माहित नाही. गोधड्या कंपाउंडर वाळत घालू नका असं म्हणणं म्हणजे हे असंवेदनशीलपणाचे लक्षण असल्याचे हाके यांनी म्हटलेय. म्हणून मी अजित दादा पवार यांना नेहमी जातीयवादी नेता म्हणतो. कारखानदारांचा, वतनदारांचा भांडवलदारांचा ठेकेदारांचा नेता तसं मी त्यांना म्हणत असतो.



   पवार कुटुंबीय नेहमीच सत्तेत असतं म्हणून मी त्यांच्याबद्दल बोलतो


 राज्याच्या राजकारणामध्ये पवार कुटुंबिय हे नेहमीच सत्तेत बसलेले असतात. त्यांच्याकडे नेहमीच तिजोरीच्या चाव्या असतात. त्यामुळेच मला त्यांच्यावर बोलावं लागतं. असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे. राज्यात सत्ता कोणाचीही येऊ द्या, म्हणजे भाजप असेल काँग्रेस असेल किंवा उद्धव ठाकरेंची सत्ता असेल. पवार कुटुंबीय नेहमीच सत्तेत बसलेले असतात आणि म्हणूनच सत्ताधाऱ्यांना प्रश्न नाही विचारायचे तर मग विचारायचे कुणाला? असा प्रश्न लक्ष्मण हाके यांनी केला आहे आणि म्हणूनच मी पवार कुटुंबावर बोलत असल्याचे त्यांनी म्हटलं.

UEI ग्लोबल एज्युकेशन (UEI) आणि इंटरनॅशनल मॅनेजमेंट अँड स्पोर्ट्स कॉलेज (IMSC) सिंगापूर यांच्यात शैक्षणिक अदानप्रदान कार्यक्रमासाठी सामंजस्य करार.......

 UEI ग्लोबल एज्युकेशन (UEI) आणि इंटरनॅशनल मॅनेजमेंट अँड स्पोर्ट्स कॉलेज (IMSC) सिंगापूर यांच्यात शैक्षणिक अदानप्रदान कार्यक्रमासाठी सामंजस्य करार.......



UEI ग्लोबल एज्युकेशन (UEI) आणि इंटरनॅशनल मॅनेजमेंट अँड स्पोर्ट्स कॉलेज (IMSC) सिंगापूर

यांना हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम हायर अँड स्किल एज्युकेशनमध्ये शैक्षणिक सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी सामंजस्य करार (MoU) वर स्वाक्षरी करण्याची घोषणा करताना अभिमान वाटतो. उत्कृष्टतेच्या दोन्ही संस्थांमधील या सामंजस्य करारात अभिव्यक्ती, विद्यार्थी आणि प्राध्यापकांचे आदानप्रदान कार्यक्रम, नवीन ट्रेंड आणि औद्योगिक पद्धतींचे संशोधन आणि विकास, इंटर्नशिप आणि प्रशिक्षण कार्यक्रम यांचा समावेश असेल.

UEI ग्लोबल एज्युकेशन (UEI) यांच्याकडून मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक मनीष खन्ना आणि इंटरनॅशनल मॅनेजमेंट अँड स्पोर्ट्स कॉलेज (IMSC) सिंगापूर यांचेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी लीम जुनवाई जोएल यांनी या सामंजस्यकरारावर स्वाक्षरी केली.


UEI हाबर्ग्रुएनहोल्डिंग्ज (यूएसए) आणि जे एम फायनान्शियलचा संयुक्त उपक्रम आहे.२० वर्षांच्या हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम एज्युकेशनसह UEI विविध व्यावसायिक आधारित कौशल्यप्र शिक्षण कार्यक्रम ऑफर करते – जे नंतर भारत आणि परदेशातील विविध मान्यताप्राप्त विद्यापीठांद्वारे हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंटमधील पदवी कार्यक्रमांमध्ये एकत्रित केले गेले.

 UEI असेअभ्यासक्रम ऑफर करते जे पारंपारिक उच्च शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षणात विभागले जाऊ शकतात. आम्ही खात्री करतो की विद्यार्थ्यांना अनुभवी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सर्वोत्तम शिक्षण आणि शिक्षण मिळत आहे तसेच पायाभूत सुविधा, शिक्षण साहित्य, प्रशिक्षण कक्ष इत्यादी आंतरराष्ट्रीय मानकांशी तुलना करता येतील अशा दर्जेदार दर्जाचे आहेत. यूके, कॅनडा, सिंगापूर, स्वित्झर्लंड, नेदरलँड्स, युएई आणि इतर विद्यापीठांसोबत आमचे बरेच संबंध आणि पार्श्वभूमी आहेत. UEI मध्ये, आम्ही जागतिक आतिथ्य क्षेत्रात उद्याचे नेते निर्माण करण्यासाठी शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशीलआहोत.



२००३ मध्ये स्थापन झालेले, IMSC सिंगापूरच्या अग्रगण्य खाजगी शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे.माजी सिंगापूर स्पोर्ट्स कौन्सिलमधील शिक्षण विभागाच्या खाजगीकरणानंतर ते उदयास आले. २०१७ मध्ये त्यांना प्रतिष्ठित एडुट्रस्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, ते विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक व्यावसायिक आणि दूरदर्शी उद्योजकांमध्ये रूपांतरित करणारे अनुकूलित शिक्षण उपाय प्रदान करतात. हे कार्यक्रम उच्च-वाढीच्या उद्योगांशी सुसंगत राहण्यासाठी काळजीपूर्वक डिझाइन केलेले आहेत; पदवीधरांना केवळ संधी सुरक्षित च नाहीत तर त्यामध्ये भरभराटीची खात्री करतात. गटाने एक जबरदस्त आंतरराष्ट्रीय उपस्थिती निर्माण करण्यावर सतत भर दिला आहे. त्यांनी १५हून अधिक देशांतील विद्यार्थ्यांना आकर्षित केले आहे आणि चीन, मलेशिया, व्हिएतनाम, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि भारतातील प्रतिष्ठित संस्थांसोबत शैक्षणिक आणि उद्योग भागीदारी स्थापित केली आहे.


रोजगार क्षमता कौशल्ये प्रदान करण्यावर आणि जगभरातील प्रसिद्ध विद्यापीठांकडून मान्यता मिळवण्यावर IMSC चे शैक्षणिक कार्यक्रम, UEI च्या विद्यार्थ्यांनी हॉस्पिटॅलिटी उद्योगाला अपेक्षित असलेल्या कौशल्यांनी सुसज्ज

असल्याची खात्री करण्याच्या उद्देशाने अखंडपणे जुळतात. हे सहकार्य विद्यार्थ्यांसाठी परिवर्तनाचे मार्ग उघडते आणि हॉस्पिटॅलिटी आणि पर्यटन क्षेत्रात सिंगापूर आणि भारताच्या प्रतिभेच्या प्रवाहाला उन्नतकरते. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण सुरू ठेवण्याचा किंवा हॉस्पिटॅलिटी उद्योगात फायदेशीर कारकीर्द सुरू करण्याचा पर्याय देखील उपलब्ध होतो.

हा सामंजस्य करार दोन्ही संस्थांना काम करण्यास आणि त्यांचे शैक्षणिक वितरण जागतिक मानकांनुसार अपग्रेड करण्यास सक्षम करेल, विशेषतः नवीन अंमलात आणलेल्या ट्रेंड, जागतिक पद्धती आणि समकालीन अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने. ही धोरणात्मक भागीदारी दोन्ही देशांमधील हॉस्पिटॅलिटी अकादमी आणि उद्योगातील अंतर भरून काढत उत्कृष्टतेच्या दोन शैक्षणिक संस्थांमधील सर्वोत्तम पद्धती आणण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. हे सहकार्य दोन्ही देशांमधील आमच्या हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास समृद्ध करण्यासाठी आणि त्यांना जागतिक नागरिक बनवण्यासाठी डिझाइन केलेला एकात्मिक शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यासाठीदेखील कार्य करेल.

दोन्ही संस्थां मधील हा करार स्वायत्त क्रेडिट आधारित कार्यक्रमांतर्गत नोंदणीकृत विद्यार्थ्यांना अनेक फायदे देईल. या कार्यक्रमात भारतात तीन महिन्यांचा व्यापक अभ्यास आणि प्रशिक्षण असलेले अभ्यासक्रम उपलब्ध असतील, त्यानंतर सिंगापूरमध्ये बारा महिन्यांचा कालावधी प्रमाणपत्र आणि सशुल्क इंटर्नशिपसह असेल. या कार्यक्रमात नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना सिंगापूरमध्ये ६महिन्यांचा इंटर्नशिप किंवा ऑन जॉब ट्रेनिंग (OJT) सहएकूण ९महिने भारतीय आणि सिंगापूर दोन्ही देशांमधून शैक्षणिक अनुभव असेल. आणि, वरील सर्व सुविधा अतिशय परवडणाऱ्या शुल्कात उपलब्ध आहेत, ज्यामध्ये सशुल्क इंटर्नशिपकिंवा OJT द्वारे कार्यक्रमाची ऑफर अत्यंत अनुदानित केली जाऊ शकते.

हे अभ्यासक्रम आणि मूल्यांकन यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना भारत, सिंगापूर आणि यूके कडून प्रमाणपत्रे देखील मिळतील.

या सामंजस्य करारामुळे नवोपक्रम, प्रत्यक्षप्र शिक्षण, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि व्यावसायिक वाढ यांना चालना मिळेल, ज्यामुळे हॉस्पिटॅलिटी लीडर्सची पुढील पिढी घडेल.

यूईआय ग्लोबल कॉलेज मध्ये “सबोर द अवध !” म्हणजेच मेक्सिकन आणि अवधी फूड फेस्टिवलचे आयोजन.

 यूईआय ग्लोबल कॉलेज मध्ये “सबोर द अवध !” म्हणजेच मेक्सिकन आणि अवधी फूड फेस्टिवलचे आयोजन.




 पुणे

दरवर्षी प्रमाणे यावर्षीही शिवाजीनगर येथील यूईआय ग्लोबल हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजमध्ये आज विद्यार्थ्यांनी आणि शेफ यांनी मिळून फूड फेस्टिव्हलचे आयोजन केले होते -सबोर द अवध! म्हणजेच मेक्सिकन आणि अवधी पाककृतींचे मिश्रण या थीम वेळेस फूड फेस्टिव्हलमध्ये होती.प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या सुमारे शंभरहून अधिक नवीन विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने बनविलेले विविध पदार्थ आपल्या पालकांना आणि पाहुण्यांना बनवून दिले आणि त्याचा त्यांनी मनसोक्त आस्वाद घेतला. 

मेक्सिकन आणि अवध प्रांतातील विविध व्यंजन यावेळी तयार करण्यात आले होते. यामध्ये स्टार्टरमध्ये, पापडी नाचोस सहस्मो की लेंटेजास .मेनकोर्स मध्ये चिकन गॅलवारी एन्चिलाडास,पनीर गॅलवारी एन्चिलाडास, जलापेनो, चटणी पॉपर्स ,चटपटा सालसा ,मेक्सिकन नवाबी राईस आणि डेझर्टमध्ये चुरोरबडी असे चविष्ट पदार्थ या फूड फेस्टिव्हलसाठी आलेल्या पाहुण्यांना चाखता आले. महाविद्यालयाचे शिक्षक,वैशाली पाटील- चव्हाण,दिल्लीचे शेफ अभिजित चंडीगढचे शेफ दिवाकरण,शेफ आनंद, शेफ रिझवान या नामांकित शेफ यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अनेक मान्यवर शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.उपसंचालिका वैशाली पाटील -चव्हाण,यांनी सांगितले आम्हीआमच्या यांच्या मार्गदर्शना खाली या फूड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. या फूड फेस्टिव्हलमध्ये विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.यावेळेस यूईआय ग्लोबल हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक श्री.मनीष खन्ना, अकॅडमीक प्रमुख वसुधा पारखी, दिल्लीचे शेफ अभिजित चंडीगढचे शेफ दिवाकरण,शेफ आनंद, शेफ रिझवान या नामांकित शेफसोबत अनेक मान्यवर शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.उपसंचालिका वैशाली पाटील -चव्हाण,यांनी सांगितले आम्हीआमच्या विद्यार्थ्यांना उद्योग मानकांनुसार व्यापकपणे हॉटेल व्यवसायातील विविध विभागात काम करण्यासाठी प्रशिक्षित करण्याचा प्रयत्न करीत आहोत.

Wednesday, August 6, 2025

"पत्रकारांच्या विरोधात पोलिसात तक्रारी देऊन त्यांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न संतापजनक आणि निषेधार्ह" : एस. एम. देशमुख कर्जत येथील प्रकार : बदनामी केली म्हणत पोलिसांकडे तक्रार.

"पत्रकारांच्या विरोधात पोलिसात तक्रारी देऊन त्यांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न संतापजनक आणि निषेधार्ह" : एस. एम. देशमुख 


कर्जत येथील प्रकार : बदनामी केली म्हणत पोलिसांकडे तक्रार. 




मुंबई : 


       पत्रकारिता करणे महाराष्ट्रात उत्तरोत्तर कठीण होत आहे. पत्रकारावर हल्ले होताहेत, खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, धमक्या दिल्या जात आहेत त्यामुळे माध्यम विश्वात मोठी अस्वस्थत: आहे. कर्जत येथील संवाद मराठी चँनलच्या पत्रकार बाबू पोटे यांच्या विरोधात पोलिसात तक्रारी देऊन त्यांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न संतापजनक आहे. या घटनेचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, डिजिटल मिडिया परिषद, रायगड प्रेस क्लब आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती निषेध करीत असल्याचे मत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी व्यक्त केले आहे 


   कर्जत येथून आलेली बातमी अशीच आहे. खालापूर तालुक्यातील सावरोली येथील के. डी. एल. बायोटेक औषध उत्पादन कंपनी बंद होऊन बारा वर्षे झाली तरी कामगारांना त्यांचा हिशोब मिळत नाही. त्या विरोधात कामगारांनी २ जुलै २०२५ रोजी कंपनीच्या गेटसमोर जमा होत निदर्शने केली. कामगार नेत्यांनी तेथे जी भाषणं केली ती संवाद मराठी चँनल वरून लाईव्ह दाखविली गेली. हे पत्रकाराचे कामच आहे. असं असताना संकेत भासे यांनी पत्रकार बाबू पोटे यांनी आपली बदनामी केली म्हणत पोलिसांकडे तक्रार केली आहे. पोलिसांनी देखील पत्रकार बाबू सीताराम पोटे यांना नोटीस पाठवून खुलासा मागितला आहे. एखाद्या सभेच्या ठिकाणी जे घडलं त्याची बातमी देणं पत्रकारांचं कामच आहे. यात कोणाची बदनामी करण्याचा प्रश्न कुठे येतो? असा प्रश्न देशमुख यांनी व्यक्त केला आहे. 



     तरीही पत्रकारांच्या विरोधात पोलिसात तक्रारी देऊन त्यांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न संतापजनक आणि निषेधार्ह आहे. राजकीय वरदहस्तातून आणि पोलिसांचा धाक दाखवत सुरू असलेली ही अरेरावी राज्यातील पत्रकार खपवून घेणार नाहीत. असा इशारा एस एम देशमुख यांनी दिली आहे. 


      रायगड प्रेस क्लब, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, डिजिटल मिडिया परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती याचा निषेध करीत आहे.

Featured Post

बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व

 बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व बारामती : बारामतीत १७ ते २४ जानेवारी दरम्यान पा...