Type Here to Get Search Results !

१८ नोव्हेंबरला संध्याकाळी सहानंतर सायलेंट पिरियड सुरू ; मतदान केंद्रांवर मोबाईल नेण्यास बंदी.

 १८ नोव्हेंबरला संध्याकाळी सहानंतर सायलेंट पिरियड सुरू ; 

मतदान केंद्रांवर मोबाईल नेण्यास बंदी. 



पुरंदर : 

     पुरंदर विधानसभा मतदार संघातील मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदारांना मतदान करतांना आपले ओळखपत्र पुरावा म्हणून सोबत ठेवणे बंधनकारक आहे. यासाठी आधारकार्ड, वोटर आयडी, वाहन परवाना असे एकूण बारा दस्ताऐवज निवडणूक आयोगाने ओळखपत्र म्हणून ग्राह्य घोषित केले आहे. त्यापैकी कोणतेही एक ओळखपत्र बुधवारी मतदान करतांना मतदाराने मतदान अधिकारी यांना दाखवून आपली ओळख दर्शवूनच मतदान करता येणार आहे. त्यामुळे बारा ग्राह्य ओळखपत्रांपैकी एक ओळखपत्र मतदान करतांना सोबत बाळगणे गरजेचे असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती वर्षा लांडगे यांनी सांगितले. 


   जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी सर्व मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात मतदानाच्या दिवशी, बुधवारी सकाळी सहा ते मतदान संपेपर्यंतच्या कालावधीत मतदारांना मोबाइल वापरण्यास मनाई असल्याचा आदेश दिला आहे. मतदानाचे चित्रीकरण, छायांकन करून गोपनीयतेचा भंग करणे हा निवडणूकविषयक गुन्हा आहे. त्या दृष्टीने मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मतदान केंद्रात अनुचित प्रकार घडू नये, गोपनीयतेचा भंग होऊ नये यासाठी मतदारांनी मतदान केंद्रात मोबाइल घेऊन जाऊ नये. तसेच केंद्राध्यक्ष, अधिकारी यांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे असे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मस्के यांनी मतदारांना आवाहन केले आहे. निवडणूक प्रक्रियेमध्ये समावेश असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांना भ्रमणध्वनी वापरण्यास मुभा देण्यात आली आहे. 


      सोमवार दिनांक १८ नोव्हेंबरला संध्याकाळी सहानंतर सायलेंट पिरेड सुरु होत असून, मतदान पार पडेपर्यंत टीव्ही, केबल, नेटवर्क, रेडिओ, सोशल मीडियाद्वारे मतदार तसेच निकालावर परिणाम करू शकणाऱ्या बाबी प्रदर्शित करण्यास निवडणूक आयोगाची मनाई आहे. राजकीय जाहिराती, कार्यक्रम, सभा, मिरवणूका यावरही बंदी आहे. अशा बाबी निदर्शनास आल्या तर त्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल तसेच गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies