Friday, January 26, 2024

तंटामुक्ती अध्यक्षपदी जयवंत भुजबळ, उपाध्यक्षपदी महावीर भुजबळ बिनविरोध निवड.

 तंटामुक्ती अध्यक्षपदी जयवंत भुजबळ, उपाध्यक्षपदी महावीर भुजबळ बिनविरोध निवड.



वाल्हे (दि.२७) वाल्हे (ता.पुरंदर) येथील ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी जयवंत बाबुराव भुजबळ तर, उपाध्यक्षपदी महावीर यशवंत भुजबळ यांची बिनविरोध करण्यात आली. वाल्हे गावचे सरपंच अतुल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीच्या कार्यालयात पार पडलेल्या ग्रामसभेत अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड करण्यात आली. 



यावेळी, माजी अमोल खवले, महादेव चव्हाण, माजी उपसरपंच सुर्यकांत भुजबळ, माजी तंटामुक्ती अध्यक्ष सत्यवान सुर्यवंशी, माजी उपसरपंच सुर्यकांत भुजबळ, प्रा. संतोष नवले,अमोल भुजबळ, हनुमंत पवार, दादासाहेब राऊत, निलेश पवार, राजेंद्र पवार, संतोष भुजबळ, अनिल भुजबळ, शंकर भुजबळ आदींसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.




यादरम्यान, वाल्हेकर ग्रामस्थांच्या वतीने सरपंच अतुल गायकवाड, उपसरपंच अमित पवार यांच्या हास्ते तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष जयवंत भुजबळ, उपाध्यक्ष महावीर भुजबळ यांचा सत्कार करण्यात आला. 


दरम्यान, ग्रामविकास अधिकारी राजाराम शेंडगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.



Tuesday, January 16, 2024

पिंपरीत शनिवारी शोभायात्रा ! अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या अनुषगांने धार्मिक आयोजन

 पिंपरीत शनिवारी शोभायात्रा ! अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या अनुषगांने धार्मिक आयोजन




पिंपरी - १७


अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी श्रीरामांच्या मृर्तीची प्रतिष्ठापना होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. २०) शहरात श्रीराम भक्तांच्या वतीने कलश यात्रा, शोभायात्रा व राम रसायन यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आयोजक धनराज बिरदा यांनी पत्रकार परिषदेत दिली.


अयोध्येत होत असलेल्या श्रीराम प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर देशभर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जात आहे. तसेच अक्षता घरोघरी वाटप करण्याची मोहीमही मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्याच अनुषंगाने पिंपरी चिंचवड शहरातही धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.


त्याचाच भाग म्हणून शनिवारी दुपारी साडेतीन वाजता पिंपरी कॅम्पातील शगुन चौक येथून सुरू होणाऱ्या शोभायात्रेचा पिंपरीगावातील नवमहाराष्ट्र महाविद्यालयाच्या प्रांगणात समारोप होणार आहे. तसेच तेथे संपूर्ण १०८ राम रसायन यज्ञ होणार आहे. त्यामध्ये सर्वांनी जात-पात, पंथ-प्रात सोडून सहभागी व्हावे. असे आवाहन बिरदा यांनी केले आहे.

Monday, January 15, 2024

शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

 नीरा येथे शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या 



   नीरा   दि.१५


         नीरा तालुका पुरंदर येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार केलेल्या प्रकरणी एका शिक्षकाला पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्या विरोधात त्याच्याकडे शिकवणीसाठी येणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने जेजुरी पोलिसात फिर्याद दिली आहे तर त्या शिक्षकाला  पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

एका अल्पवयीन मुलीवर असे लैंगिक अत्याचार करून शिक्षकाने शिक्षकी पेशाला काळीमा फासली  असल्याचे म्हणत पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


     याबाबत मिळालेल्या माहिती नुसार नीरा (ता.पुरंदर) वार्ड नंबर एक मध्ये  ज्ञानदिप कोचींग क्लासेस मध्ये शिकवण्याचे काम करणाऱ्या सुनिल चव्हाण यांच्या विरोधात  फिर्याद देण्यात आली आहे . त्याच्यावर बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिढीत मुलगी ही त्याच्याकडे शिकवणीसाठी जात होती. त्याने पिढीत मुलीला प्रथम लग्नाचे आमिष दाखवले.  दि. १/५/२०२३ रोजी दुपारी एका वाजले नंतर  ज्ञानदिप कोचींग क्लासचे आतील रूममध्ये आरोपीने   पिढीत मुलगी अल्पवयीन आहे हे माहीती असताना , तु मला आवडतेस माझे तुझेवर खुप प्रेम आहे असे म्हणुन आपण लग्न करू असे म्हणुन जवळ ओढुन घेवुन  विनय भंग केला. त्यानंतरही त्याने असे कृत्य तिचे सोबत वेळोवेळी केलेले. त्यांनतर साधारण  ८ दिवसांनी सुटीचे दिवशी क्लास संपलेवर साधारण दुपारी  १ वाजले नंतर आरोपी सुनिल चव्हाण. यांनी  तिला  सर्व कोचिंग क्लासेसच्या मुली निघुन गेल्या नंतर थांबवुन घेतले व तिला शिकवण्याचे रूम सोडुन दुसरे रूममध्ये नेवुन जवळ घेवुन,तिचे इच्छेविरूध्द जबरदस्तीने शारीरीक संभोग केला. त्यावेळी पिढीत मुलीने असे करू नका म्हणुन विरोध केला.परंतु त्यांनी तिचे काही एक न ऐकता  तिचे सोबत जबरदस्तीने शारीरीक संबध ठेवले. त्यानंतरही त्यांनी तिला नापास करण्याची धमकी देउन  तिचे सोबत इच्छेविरूध्द जबरदतीने शारीरीक संबध ठेवले. 

    याबाबतचारअधिकचा तपास पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक  मनोज नवसारे करीत आहेत.


Saturday, January 13, 2024

पत्रकारांचे प्रश्न न सोडवणाऱ्या सरकारच्या विरोधात आमचा लढा सुरूच राहील : एस.एम. देशमुख यांचे प्रतिपादन माहूर येथे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व पत्रकारांचा मेळावा उत्साहात

 पत्रकारांचे प्रश्न न सोडवणाऱ्या सरकारच्या विरोधात आमचा लढा सुरूच राहील : एस.एम. देशमुख यांचे प्रतिपादन


माहूर येथे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व पत्रकारांचा मेळावा उत्साहात

दै



मुंबई :  'मराठी पत्रकार परिषदेची कोणतीही राजकीय भूमिका नाही. जे सरकार पत्रकारांचे प्रश्न सोडवतील, आम्ही त्या सरकारच्या सोबत आहे. पण जे सरकार पत्रकारांचे प्रश्न सोडवणार नाही, आम्ही त्यांच्या विरोधात लढत राहू. मग ते सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी आम्ही लढा सुरूच ठेवू,' असे प्रतिपादन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी केले.

     मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणारा वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगा अण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा व पत्रकार मेळावा शनिवारी (१३ जानेवारी २०२४) नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहूरगड येथे उत्साहात पार पडला. यावेळी देशमुख बोलत होते. याप्रसंगी आमदार भीमराव केराम, स्वागताध्यक्ष रामदास सुमठाणकर,  माहूर नगर पंचायत नगराध्यक्ष फिरोज दोसानी, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम.देशमुख, नांदेड भाजप जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर, जिल्हा परिषद नांदेड माजी उपाध्यक्ष समाधान जाधव, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख ज्योतिबा खराटे, माहूर नगर परिषद माजी नगराध्यक्ष समरजी त्रिपाठी, मराठी पत्रकार परिषद विश्वस्त किरण नाईक, परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी, टीव्ही असोसिएशनचे अध्यक्ष विनोद जगदाळे, महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर, डिझिटल मीडिया राज्याध्यक्ष अनिल वाघमारे, मराठी पत्रकार परिषद राज्य प्रसिद्धीप्रमुख संदीप कुलकर्णी, सह प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे,  लातूर विभाग विभागीय संघटक प्रकाश कांबळे, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ गोवर्धन बियाणी, जिल्हा कार्याध्यक्ष संतोष पांडागळे, माहूर तालुका मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष सरफराज दोसानी यांच्यासह राज्यभरातून आलेले पदाधिकारी, पत्रकार, मराठी पत्रकार परिषदेचे सदस्य उपस्थित होते.




देशमुख यांनी पुढे बोलताना सांगितले की, 'सरकार कुठल्याही असले तरी पत्रकारांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन नकारात्मक असाच आहे. सरकारच्या पेन्शन योजनेबाबत नेहमी हे दिसून येते. पत्रकारांना पेन्शन देताना सरकार त्यांच्याकडे बजेट नसल्याचे नेहमीच सांगते. त्यामुळे आता पत्रकारांच्या पेन्शनसाठी सरकारने अर्थसंकल्पातच तरतूद करावी, अशी मागणी आम्ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. तसेच पत्रकार संरक्षण कायदा  झाला, पण तो कागदोपत्री आहे. प्रत्यक्षात पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आलेला नाही. कारण या कायद्याचे नोटिफिकेशनच अद्याप निघाले नाही. ही सरकारने एक प्रकारे पत्रकारांची केलेली फसवणूकच आहे.   पत्रकार संरक्षण कायद्यासाठी वेळप्रसंगी न्यायालयात जाऊ,' असे सांगतानाच देशमुख पुढे म्हणाले,' पत्रकारांनी समाज, सरकार तुमच्यासोबत येईल, ही अपेक्षा ठेवण्यापेक्षा पत्रकारांनीच पत्रकारांसाठी आता काहीतरी करण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण पत्रकारावर हल्ला झाला तर पत्रकार वगळता कोणी निवेदन सुद्धा देण्यासाठी पुढे येत नाही. हे आपण वारंवार पाहतो. त्यामुळे आता मराठी पत्रकार परिषद पत्रकारांना मदत करता यावी, यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून एक कोटी रुपयांचा फंड उभारण्यासाठी काम करत आहे. या फंडामधून दरवर्षी किमान २५ पत्रकारांना मदत करता आली तरीही ते खूप मोठे काम होईल.'

आमदार भीमराव केराम मेळाव्याला राज्यभरातून आलेल्या पत्रकारांचे स्वागत केले व ते म्हणाले,' मराठी पत्रकार परिषद राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. लेखणीच्या माध्यमातून आमच्या सारख्या राजकीय नेत्यांनी केलेली कामे पत्रकार लोकांसमोर आणतात. तसेच वेळप्रसंगी लेखणीतून आम्हाला आमच्या चुका दाखवून देण्याचे कामही पत्रकार करतात. खरंतर एखाद्या राजकीय नेत्याची ओळख ही पत्रकारांच्या लेखणीच्या माध्यमातूनच होत असते,' असे सांगत आमदार केराम यांनी पत्रकारांच्या कामाचा गौरव केला. तसेच परिषदेचे मुख्य विश्वस्त यांच्या संघर्षाचे कौतुक केले.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सीएनएन १८ न्यूज च्या ब्युरो चीफ विनया देशपांडे म्हणाल्या की, ' आजच्या काळात  डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. पण अनेकदा आपल्या गावातील प्रसंगी प्रश्न हे भाषेचा अडथळा असल्याने आपण मर्यादित लोकांपर्यंत पोहोचवतो. मात्र 'एआय' चे दारे उघडल्याने भाषेचा अडसर संपत असून या संधीचा आता ग्रामीण भागातील पत्रकारांनी फायदा घेण्याची गरज आहे. तुम्हाला तुमच्या गावातील, मातीतील प्रश्न जगभरात पोहोचवण्याची ही संधी आहे. छोट्या छोट्या गोष्टींचा विचार न करता मोठ्या संधीचा फायदा घ्या,' असे आवाहन देशपांडे यांनी केले. 'ज्या लोकशाहीला स्वतःच्या त्रुटींची जाणीव असते, ती प्रबळ लोकशाही असते. अशा लोकशाहीची जाणीव प्रत्येक पत्रकाराला असणे गरजेचे आहे,' असे सांगतानाच देशपांडे यांनी परदेशामध्ये पत्रकारिते संबंधित आलेल्या अनुभवांची माहिती यावेळी दिली.

स्वागताध्यक्ष रामदास सुमठाणकर म्हणाले, 'आज राज्यभरातील पत्रकार येथे आल्याचा आनंद होत आहे. आज मंडपामध्ये बसण्यासाठी जागा नाही, एकही खुर्ची रिकामी नाही, हेच या कार्यक्रमाचे यश आहे.  टेक्नॉलॉजी सुधारत असली तरी वर्तमानपत्रातील बातमीची विश्वासार्थता कायम आहे. मराठी पत्रकार परिषदेच्या संघटनांचे कौतुक करतो,' असेही ते म्हणाले.

नगराध्यक्ष फिरोजभाई दोसानी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मराठी पत्रकार परिषदेच्या संघटनाचे कौतुक केले. 'आजपर्यंत एवढा मोठा मेळावा मी माहूर मध्ये पाहिला नाही,' असेही ते म्हणाले.

मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी जिल्हा व तालुका पुरस्कार विजेत्या संघानी केलेल्या कार्याची माहिती दिली. तसेच माहूर तालुका पत्रकार संघ व नांदेड जिल्हा पत्रकार संघाने माहूरगड पत्रकार मेळाव्याचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल त्यांचे कौतूक केले. पाबळे यांनी मराठी पत्रकार परिषदेच्या वाटचालीची माहिती दिली.
परिषदेचे विश्वस्त किरण नाईक यांनी सांगितले की,' मराठी पत्रकार परिषदेला ८४ वर्षांची परंपरा आहे. या परंपरेला कुठेही गालबोट न लावता, व कोणासमोर न झुकता पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचे काम मराठी पत्रकार परिषदेने केले आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील पत्रकारांची साथ  असल्यामुळेच पत्रकारांचे प्रश्न सोडवणे शक्य होत आहे. आगामी काळातही आह्मी पत्रकारांचे प्रश्न सोडवले जातील,'असेही ते म्हणाले.
दरम्यान, लोकशाही या न्यूज चॅनलवर करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरफराज दोसानी यांनी केले. तर, सूत्रसंचालन श्रद्धा वरणकर व राम तरटे यांनी केले. आभार विजय जोशी यांनी मानले.

…..............

*'या' जिल्ह्याचा करण्यात आला पुरस्कार देउन सन्मान*

*रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार यंदा *उत्तर_नगर* आणि *दक्षिण_नगर* जिल्ह्यांना विभागून देण्यात आला* दक्षिण नगर जिल्ह्याचा पुरस्कार जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके यांनी स्वीकारला. तर, उत्तर नगर जिल्ह्याचा पुरस्कार जिल्हाध्यक्ष अमोल वैदय यांनी स्वीकारला.


*वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार*

1) मराठवाडा विभाग : *माजलगाव तालुका पत्रकार संघ*, जिल्हा बीड
2) लातूर विभाग : *माहूर तालुका  पत्रकार संघ*, जिल्हा नांदेड
3) नाशिक विभाग : *साक्री तालुका मराठी पत्रकार संघ* जिल्हा धुळे
4) पुणे विभाग : *शिरूर तालुका मराठी पत्रकार संघ*, जिल्हा पुणे
5) अमरावती विभाग : *तेल्हारा तालुका पत्रकार संघ*, जिल्हा अकोला
6) कोल्हापूर विभाग : *बत्तीस शिराळा तालुका पत्रकार संघ*, जिल्हा सांगली
7) नागपूर विभाग : *आर्वी तालुका पत्रकार संघ* जिल्हा वर्धा
8) कोकण विभाग : *अंबरनाथ तालुका पत्रकार संघ* जिल्हा ठाणे.

..............

*अधिस्वीकृती समितीवर निवड झालेल्यांचा सन्मान*

मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने राज्य व विभागीय अधिक सिक्युरिटी समितीवर निवड झालेल्या अध्यक्ष व सदस्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला. राज्य समितीवर निवड झालेले एस. एम.देशमुख, किरण नाईक, शरद पाबळे, विनोद जगदाळे, शिवराज काटकर, संजय पितळे यांचा तर विभागीय समिती अध्यक्ष दीपक कैतके, हरिष पाटणे, विजय जोशी यांचा तसेच विभागीय समितीवरील सदस्यपदी निवड झाल्याबद्दल विजयसिंह होलम, विनया देशपांडे, अविनाश भांडेकर, चंद्रसेन जाधव यांचा सन्मान करण्यात आला.
…............

*माहूर येथील ज्येष्ठ पत्रकारांना दिला जीवनगौरव*

याप्रसंगी समर मुरारीलाल त्रिपाठी, नंदू उर्फ विनायक बापूराव संतान, हाजी कादर दोसानी, गोपाळराव कदम, दत्तराव लालूजी मोहिते यांचा जीवनगौरव पुरस्कार देउन सन्मान करण्यात आला.
...............

Friday, January 12, 2024

सोमेश्वर कारखान्याने सभासद शेतकऱ्यांचा ऊस पहिला तोडावा: महेश जेधे - आम् आदमी पार्टी

 सोमेश्वर कारखान्याने  सभासद शेतकऱ्यांचा ऊस पहिला तोडावा: महेश जेधे - आम् आदमी पार्टी 

नीरा  दि.१२




      सोमेश्वर कारखान्याच्यावतीने सध्या गाळपासाठी  गेटकेन ऊस मोठ्या प्रमाणात आणला जात आहे.मात्र त्यामुळे सभासद शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून,अनेक सभासद शेतकऱ्यांचे उसाचे पीक २० महिने शेतात उभे  आहे. त्यामुळे  सभासद शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. सभासद शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी  कारखाना प्रशासनाने सभासदांचा ऊस पहिला तोडावा, नंतर  गेट केन ऊस आणावा. अशी मागणी आम् आदमी पार्टीचे पुरंदर तालुका युवक अध्यक्ष महेश जेधे यांनी केली आहे. कारखाना प्रशासनाने जर सभासदांच्या उसाला प्राधान्य दिले नाही तर तीव्र आंदोलनाचा  इशारा त्यांनी दिला आहे.



         गुरुवारी (दि.११) रोजी आम् आदमी पार्टी पुरंदर तालुका यांच्यावतीने  सभासदांच्या उसाला प्राधान्य देऊन तो प्रथम तोडला जावा अशी मागणी मारणारे निवेदन आम् आदमी पक्षाच्या वतीने कारखाना प्रशासनाला देण्यात आले आहे.. यामध्ये सभासदांचे ऊस तातडीने नेहण्या बाबत विनंती करण्यात आली आहे.पुरंदर तालुका आणि बारामती तालुक्यातील काही गावात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे शेतातच  ऊस वाळून जात आहेत.त्यामुळे उसाचे वजन घटत आहे.याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.मात्र कारखाना प्रशासन जास्तीत जास्त बिगर सभासद ऊस आणत आहे.त्यामुळे कारखान्याचा मालक असलेला सभासद शेतकरी डावलला जात आहे. त्याचा स्वतःचा कारखाना असताना देखील त्याचा ऊस तुटत नाही.काही शेतकऱ्यांचा ऊस २०: २० महिने शेतात आहे.त्यामुळे सभासद शेतकऱ्याचे दुहेरी नुकसान झाले आहे.त्यामुळे सभासद शेतकर्यांचा ऊस प्राधान्याने न तोडल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महेश जेधे यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी नीरा येथे पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दि

ली आहे.


Tuesday, January 9, 2024

माहूर मेळाव्यात होणार 'लोकशाही' वरील बंदीचा निषेध पत्रकार काळ्या फिती लावून केंद्र सरकारच्या या कारवाईचा करणार निषेध

 माहूर मेळाव्यात होणार 'लोकशाही' वरील बंदीचा निषेध

पत्रकार काळ्या फिती लावून केंद्र सरकारच्या या कारवाईचा करणार निषेध





मुंबई :
       चॅनलवर बंदी आणून सरकार माध्यमांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करीत आहे. 'लोकशाही' न्यूज चॅनलवरील बंदीची कारवाई निंदनीय आणि संतापजनक आहे. १३ जानेवारी रोजी माहूर येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या मेळाव्यात सर्व पत्रकार काळ्या फिती लावून केंद्र सरकारच्या या कारवाईचा निषेध करतील अशी माहिती  एस. एम. देशमुख यांनी दिली आहे.

       लोकशाही न्यूज चॅनलवर सरकारने आज अचानक एक महिन्यासाठी बंदी घातली आहे. यापुर्वी देखील सरकारकडून असा प्रयोग झाला होता. व्यवस्था विरोधी भूमिका घेणाऱ्या लोकशाहीवर बंदी आणून सरकार माध्यमांचा आवाज तर बंद करीत आहेच. त्याचबरोबर माध्यमांवर दहशत निर्माण करून अंकुश ठेवण्याचा ही प्रयत्न करीत आहे. सरकारची ही कारवाई कोणत्याही परिस्थितीत समर्थनीय नाही.
मराठी पत्रकार परिषद, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, डिजिटल मिडिया परिषदेसह विविध पत्रकार संघटनांनी याचा निषेध केला आहे.






      मात्र एवढ्यावरच न थांबता मराठी पत्रकार परिषदेच्या माहूर मेळाव्यास येणारा प्रत्येक पत्रकार काळ्या फिती लावून या ठोकशाहीचा निषेध करेल. असे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी, डिजिटल मिडिया परिषदेचे कार्याध्यक्ष अनिल वाघमारे, महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर यांनी स्पष्ट केले आहे.
       दरम्यान आज बुधवारी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने परिषदेचे कोषाध्यक्ष विजय जोशी आणि जिल्हा अध्यक्ष गोवर्धन बियाणी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन लोकशाहीवरील कारवाई तातडीने मागे घेण्याची मागणी केली.

Saturday, January 6, 2024

महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगारांसाठीच्या योजनांचा लाभ आता पुरंदरकरांना ही मिळणार : ममता शिवतरे लांडे. शिवसेना गणप्रमूख विराज निगडे यांनी नीरा येथे योजनेचे नोंदणी अभियान सुरू केले.

 महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगारांसाठीच्या योजनांचा लाभ आता पुरंदरकरांना ही मिळणार : ममता शिवतरे लांडे.


शिवसेना गणप्रमूख विराज निगडे यांनी नीरा येथे योजनेचे नोंदणी अभियान सुरू केले.





पुरंदर : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेची नोंदणी गेली तीन दिवस नीरा शहरात सुरू आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी कल्याणकारी योजना आहे. पुरंदरच्या प्रत्येक गावातील बांधकाम कामगारांसह इतर मोलमजुरी करणाऱ्या मजूरांची नोंदणी करुन प्रत्येकाला यांचा लाभ मिळणार आहे. जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या नोंदणी अभियानाचा लाभ घ्यावा असे आवाहन ममता शिवतारे लांडे यांनी केले आहे.

  नीरा (ता. पुरंदर) येथे पुरंदर तालुका शिवसेनेच्यावतीने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेची नोंदणी अभियान सुरू आहे. या अभायानला सौ. लांडे यांनी रविवारी भेट दिली यादरम्यान त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे आयोजन गुळूंचे कोळविहिरे शिवसेना गणप्रमूख विराज निगडे यांनी केले होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या शालिनीताई पवार, प्रिमियम चिक फिडचे व्यवस्थापक सतिश कोंडे, बारामती तालुका युवा शिवसेनाप्रमुख स्वप्नील जगताप, पुरंदर उप तालुकाप्रमुख दयानंद चव्हाण, प्रकाश शिंदे, रणजित निगडे, गणेश गडदरे, कर्नलवाडीच्या सरपंच सुवर्णा महानवर, सदस्या स्वप्नाली निगडे, वागदरवाडी माजी सरपंच उषा पवार, केशव बंडगर, अरविंद निगडे, लालासाहेब दगडे, अमोल निगडे यांसह मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.

     ममता शिवतरे लांडे पुढे म्हणाल्या पुरंदरच्या सर्व गावात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेचे नोंदणी अभियान होणार आहे. बारामती तालुक्यात युवासेना प्रमुख स्वप्नील जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी १ हजार २०० हुन अधिक कामगारांची नोद केली आहे. पुरंदरमध्ये नीरा शहरातून याची सुरवात झाली आहे. गेली तीन दिवसांत या नोंदणी अभियानात ४०० लाभार्थ्यांनी आपली ऑनलाईन नोंदणी केली आहे. लवकरच या सर्वांना कामगारांना लागणाऱ्या साहित्याची पेटी मिळणार आहे. या पेटीत बहुउपयोगी साहित्य असणारं आहे. या नंतर या नोंदणीकृत कामगारांना विमा, कर्ज, मुलांना शैक्षणिक सुविधा व सवलती मिळणार आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विराज निगडे यांनी केले, तर आभार दयानंद चव्हाण यांनी मानले. 

Wednesday, January 3, 2024

मराठी पत्रकार परिषदेचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले. बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेतील त्रुटी बाबत लवकरच मंत्रालयात बैठक: मुख्यमंत्री

 मराठी पत्रकार परिषदेचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले. 

बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेतील

त्रुटी बाबत लवकरच मंत्रालयात बैठक: मुख्यमंत्री





सातारा : ज्येष्ठ व वयोवृद्ध पत्रकारांसाठी असलेल्या बाळशांस्त्री जांभेकर सन्मान योजनेतील त्रुटी बाबत लवकरच मंत्रालयात बैठक लावू अशी गाव्ही राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी दिली.

नायगाव तालुका खंडाळा येथे सावित्रीबाई फुले जयंती सोहळयावेळी सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश पाटणे, सदस्य चंद्रसेन जाधव यांनी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांना या बाबत लेखी निवेदन दिले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी उपरोक्त आश्वासन दिले.

साताऱ्यासह राज्यातील विविध जिल्ह्यातून वयोवृध्द पत्रकारांचे बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजेनेचे प्रस्ताव परत येत असल्याने , बराच काळ प्रलंबित राहत असल्याने पत्रकारांनी या बाबत लक्ष घालण्याची मागणी केली होती. योजना असूनही पात्र व गरजू पत्रकारांना लाभ मिळत नाही. ही बाब आज हरिश पाटणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. या विषयावर मंत्रालयात मुख्यमंत्री महोदय, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, किरण नाईक, माहिती व जनसंपर्क विभागाचे उच्च पदस्थ अधिकारी अशी स्वतंत्र बैठक लावावी अशी मागणी पाटणे यांनी केली. त्यावर लगेचच मुख्यमंत्री महोदयांनी अशी बैठक लवकरच लावू अशी ग्वाही दिली.

Tuesday, January 2, 2024

चक्क आ.संजय जगताप यांचं दोन मतदार संघात नाव ? आमदार संजय जगताप यांना निवडणूक विभागाची नोटीस

 चक्क आ.संजय जगताप यांचं दोन मतदार संघात नाव ? आमदार संजय जगताप यांना निवडणूक विभागाची नोटीस



दुसऱ्या मतदार संघात दुबार नाव असल्याने ४ तारखेला हजर राहण्याची सूचना 


पुरंदर विधानसभा मतदार संघ सोडून इतर मतदार संघात नाव ? 


 सासवड. दि.३


   पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांचे नाव दोन वेग वेगळ्या मतदार संघात असल्याचे निवडणूक विभागाच्या निदर्शनास आले आहे.त्यामुळे निवडणूक विभागाने या बाबत आ.संजय जगताप यांना निवडणूक विभागाने नोटीस दिली आहे.४ तारखेला निवडणूक कार्यालयात रहिवाशी पुरावे घेऊन हजर न राहिल्यास मतदार यादीतून नाव वगळले जाईल असं त्या नोटीस मध्ये सांगण्यात आले आहे.

        पुरंदर हवेली मतदार संघातील 32 हजार लोकांना मतदार यादीत दुबार नावे असल्याचे म्हणत निवडणूक विभागाने नोटीसा दिल्या आहे. याबाबत काल मंगळवारी आ.संजय जगताप यांनी सासवड येथे निवडणूक कार्यालयात जावून जाब विचारला होता.या नोटिसा चुकीच्या असल्याचं त्यांनी म्हटलं होत. याबाबत त्यांनी माजी मंत्री विजय शिवतारे यांच्यावर आरोप केले होते. मुख्यमंत्र्यांच्या कानाला लागणाऱ्याच ऐकून प्रशासन काम करीत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.या नोटिसा कशा चुकीच्या आहे हे देखील संजय जगताप यांनी दाखवून दिलं होत. मात्र यानंतर काल सायंकाळी आ.संजय जगताप यानांच या बाबतची नोटीस प्राप्त झाली आहे. तुमचं नाव दुसऱ्या मतदार संघात असल्याने तुमचे रहिवाशी पुरावे घेऊन ४ जानेवारीला हजर राहण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे. दुसरीकडे शिवसेना तालुका अध्यक्ष आणि युवक अध्यक्ष यांच्या कुटुंबातील नावे तालुक्यातील दोन दोन गावात आहेत. त्यांच्या मला गावी आणि सासवड अशा ठिकाणी त्यांची नवे असल्याचं आमदार संजय जगताप यांनी दाखवून दिले आहे. दोन्ही ठिकाणच्या यादीत शिवसेनेच्या पदाधिकारी व त्यांच्या कुटुंबातील लोकांची नावे आहेत.त्यांना मात्र मात्र कोणतीही नोटीस अद्याप दिली गेली नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या हेतू बद्दल शंका व्यक्त केली जाते आहे.



निवडणूक विभागाचं तोंडावर बोट


  निवडणूक विभागानं दिलेल्या या नोटीस बाबत काल पत्रकारांनी तहसीलदार विक्रम राजपूत यांना प्रश्न विचारला. मात्र त्यांनी याबाबत बोलण्यास स्पष्ट नकार दिला. याबाबत बोलण्याचा आपल्याला अधिकार नसल्याचं म्हणत त्यांनी उत्तर देणं नाकारलं.मात्र अधिकाऱ्यांच्या या अनागोंदी कारभारामुळे सामान्य नागरिकांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागत आहे.



 माझ्या नावाशी साम्य असलेल्या तालुक्यात आणखी १४ व्यक्ती आहेत. : आ.संजय जगताप


       आ.संजय जगताप यांच्या नावाची साम्य असलेल्या तालुक्यात मी सोडून आणखी १४ व्यक्ती असल्याचे आ.संजय जगताप यांनी म्हटलंय.तर मग ही नावे दुबार कशी होतील? असा सवाल जगताप यांनी केला आहे. अनेक लोकांची आडनावे देखील वेगळी आहेत.तरी देखील लोकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.केवळ दोन नावे समान आहेत म्हणून अनेकांना नोटिसा दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोग चुकीच्या पद्धतीने काम करत असल्याचा आरोप त्यांनी के

ला आहे.


Featured Post

बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व

 बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व बारामती : बारामतीत १७ ते २४ जानेवारी दरम्यान पा...