Type Here to Get Search Results !

प्रयोगशील, संवेदनशील अभिनयसम्राटाची एक्झिट, बिग बींशी होतं भावनिक नातं


 ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९४५ रोजी पुण्यात झाला.

चंद्रकांत आणि हेमावती गोखले यांनी त्यांच्यावर केलेल्या संस्कारांतून त्यांची जडणघडण झाली.

आपल्या अनोख्या अभिनयशैलीच्या बळावर मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही त्यांनी ठसा उमटवला. प्रयोगशील, संवेदनशील, सकस, सजग अभिनय त्याला सुस्पष्ट आणि शैलीदार संवादफेकीची जोड देत त्यांनी अभिनेता म्हणून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. दिग्दर्शक म्हणूनही आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले. विक्रम यांच्या रूपात गोखले घराण्यातील चौथ्या पिढीने चित्रपटसृष्टीची सेवा केली आहे. सिनेसृष्टीतील ग्लॅमरसोबतच येणारा पैसा, प्रसिद्धी आणि नावलौकिक जपत समाजसेवेचा वारसाही त्यांनी अत्यंत मनापासून जोपासला. ज्या काळात स्त्रियांना मानसन्मानापासून वंचित राहावे लागायचे, त्या काळात विक्रम यांच्या आजींनी पुरुषांची मक्तेदारी मोडून काढत सिनेसृष्टीत अभिनयात ठसा उमटवला. विक्रम यांनी चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी एकांकिका स्पर्धांसोबत नाट्यानुभवही घेतला होता. नोकरीत मन न रमल्याने त्यांनी स्वत:ला अभिनयातच झोकून दिले. 'बॅरिस्टर' या नाटकाच्या निमित्ताने त्यांची अभिनेत्री-दिग्दर्शिका विजया मेहता यांच्याशी ओळख झाली आणि मराठी रंगभूमीला एक राजबिंडा नट मिळाला.

गाजलेली नाटके :

एखादी तरी स्मितरेषा, कथा, कमला, कल्पवृक्ष कन्येसाठी, दिल अभी भरा नही, खरं सांगायचं तर, छुपे रुस्तम, जावई माझा भला, दुसरा सामना, नकळत सारे घडले, पुत्र मानवाचा, बॅरिस्टर, मकरंद राजाध्यक्ष, महासागर, मी माझ्या मुलांचा, संकेत मीलनाचा, समोरच्या घरात, सरगम, स्वामी. मराठी चित्रपट : मॅरेथॉन जिंदगी, आघात, आधारस्तंभ, आम्ही बोलतो मराठी, कळत नकळत, ज्योतिबाचा नवस, दरोडेखोर, दुसरी गोष्ट, दे दणादण, नटसम्राट, भिंगरी, महानंदा, माहेरची साडी, लपंडाव, वजीर, वऱ्हाडी आणि वाजंत्री, वासुदेव बळवंत फडके, सिद्धान्त, गोदावरी. हिंदी चित्रपट : अकेला, अग्निपथ, अधर्म, आंदोलन, इन्साफ, ईश्वर, कैद में है बुलबुल, क्रोध, खुदा गवाह, घर आया मेरा परदेसी, चॅम्पियन, जखमों का हिसाब, जज्बात, जय बाबा अमरनाथ, तडीपार, तुम बिन, थोडासा रूमानी हो जाय, धरम संकट, परवाना, प्रेमबंधन, फलक द स्काय, बदमाश, बलवान, मुक्ता, यही है जिंदगी, याद रखेगी दुनिया, लाइफ पार्टनर, लाडला, वजीर, श्याम घनश्याम, सती नाग कन्या, सलीम लंगडे पे मत रो, स्वर्ग नरक, हम दिल दे चुके सनम, हसते हसते, हे राम. मालिका : श्वेतांबरा, या सुखांनो या, अग्निहोत्र, आकाश पेलताना, बालपण देगा देवा, भाग्यलक्ष्मी, संभव असंभव, सिंघासन, जीवन साथी, विरुद्ध, संजीवनी, अल्पविराम, मेरा नाम करेगी रोशन, कुछ खोया कुछ पाया, चंदन का पालना रेशम की डोरी, द्विधाता, उडान, शिव महापुराण, जुनून, अकबर बिरबल, इंद्रधनुष, क्षितिज ये नहीं, अहंकार, नटखट नारद, घर आजा परदेसी, जाना ना दिल से दूर, जीवन साथी, कुछ अपने कुछ पराये, गुरुदक्षिणा, कथा सागर, सबूत, हिंदुस्तानी, साहील. गुजराती चित्रपट : पो जद्रो, कोइनु मिंधळ कोईना हाती तेलुगू चित्रपट : कलावरमाये माडिलो तमिळ चित्रपट : आळवंधन

पुरस्कार :

अनुमती या चित्रपटातील भूमिकेसाठी २०१३ सालचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार (इरफान खान यांच्याबरोबर विभागून), विष्णुदास भावे जीवनगौरव पुरस्कार (२०१५), बलराज साहनी- साहिर लुधियानवी फाउंडेशनतर्फे बलराज साहनी पुरस्कार, भाऊ साने जीवनौरव पुरस्कार (२०१७), पुलोत्सव सन्मान (२०१८), चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार.

सर्व माध्यमांमध्ये चौफेर मुशाफिरी...
रंगभूमी, चित्रपट आणि मालिका या तिन्ही माध्यमांमध्ये मुशाफिरी करणाऱ्या गोखलेंनी आजच्या युगातील माध्यम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेबसीरिजमध्येही काम केले आहे. २०२० मध्ये त्यांची 'अवरोध - द सेज विदीन' ही वेबसीरिज प्रदर्शित झाली होती, तर 'आंबेडकर - द लिजेंड' या आगामी वेबसीरिजमध्येही ते दिसणार आहेत. या वेबसीरिजप्रमाणेच गोखले यांचा 'फुलराणी' हा मराठी चित्रपटही प्रदर्शनासाठी सज्ज आहे.

अभिनयासोबत
समाजसेवेचा वारसा...
पणजी, आजी, वडील यांचा अभिनयाचा वारसा गोखले यांनी नेटाने जोपासला. त्यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय सिनेसृष्टीतील पहिल्या अभिनेत्री म्हणून, तर आजी कमलाबाई गोखले भारतीय सिनेसृष्टीतील पहिल्या फिमेल चाइल्ड आर्टिस्ट म्हणून ओळखल्या जातात. वडील चंद्रकांत गोखले अभिनयासोबतच सामाजिक कार्यांसाठी परिचित होते. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनीही कुटुंबाच्या धर्मदाय संस्थेच्या माध्यमातून अपंग सैनिकांना आर्थिक मदत केली. कुष्ठरोग्यांच्या मुलांसोबतच अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी हातभार लावला.

अमिताभच्या पत्रामुळे मिळाले घर...
विक्रम गोखलेंनी एका मुलाखतीत अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या मैत्रीचा किस्सा सांगितला होता. ते म्हणाले की, सिनेसृष्टीत प्रवेश करताना मला खूप संघर्ष करावा लागला. मी प्रचंड आर्थिक संकटातून जात होतो. मुंबईत घर शोधत होतो. अमिताभ बच्चन यांना हे कळताच त्यांनी त्या वेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना वैयक्तिकरीत्या पत्र लिहिले. त्यांनी दिलेल्या शिफारस पत्रामुळेच मला सरकारकडून घर मिळाले. आजही ते पत्र माझ्याकडे असून, मी ते फ्रेम करून ठेवले आहे. ते मला आणि मी त्यांना ओळखतो याचा मला खूप अभिमान आहे.

कोल्हापूरकरांना दिसला जीव ओवाळणारा सच्चा दोस्त
विक्रम गोखले यांनी उमेदीच्या काळातील अनेक वर्षे कोल्हापुरात घालवली. त्यांनी अखेरपर्यंत आपली जीवाभावाची माणसं जपली. ज्येष्ठ रंगकर्मी शशिकांत जोशी, गोपाळ खेर हे त्यांचे जुने सहकारी. गोपाळ खेर यांचे निधन झाले. कोल्हापुरात आल्यानंतर गोखले बादशाही लॉजवर राहायचे. गोपाळ खेर अखेरच्या टप्प्यात आर्थिक अडचणीत असताना त्यांनी खेर यांची भेट घेऊन उशीजवळ ५० हजार रुपये ठेवून निघून आले. काही महिन्यांपूर्वीच वृद्ध कलाकारांच्या निवाऱ्यासाठी मराठी चित्रपट महामंडळाला पुण्यातील अडीच एकर जागा त्यांनी दिली.

गोखले यांनी चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही कला माध्यमात लीलया विहार केला. 'गोदावरी' हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला. बिग बी अमिताभ बच्चन यांनी विक्रम गोखले यांच्या आग्रहाखातर 'एबी ॲंड सीडी' चित्रपटात काम केले होते.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies