Type Here to Get Search Results !

माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिली उभे रांगण उत्साहात.

 माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिली उभे रांगण उत्साहात.



चांदोबाचा लिंब येथे दोन्ही अश्वानी धावत धावत रथाला प्रदक्षिणा मारली. 


उभ्या रिंगण सोहळ्याने वारकर्‍यांमध्ये नवचैतन्य


नीरा : ३०


      वारीच्या वाटचालीत नवचैतन्य निर्माण करणारा पहिल्या उभ्या रिंगणाचा सोहळा आज (गुरुवार ) मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात चांदोबाचा लिंब येथे पार पडला. सायंकाळी हा सोहळा तरडगांव मुक्कामी विसावला. उद्या हा सोहळा दोन दिवसाच्या फलटण मुक्कामासाठी मार्गस्थ होइल. 


      लोणंद येथील अडीच दिवसांच्या विश्रांतीनंतर माऊलींच्या पालखी सोहळ्याची तरडगांव मुक्कामी जाण्याची तयारी सुरू झाली. परंपरेप्रमाणे पहाटे संस्थानचे प्रमुख विश्वस्थ योगेश देसाई यांच्या हस्ते माऊलींची महापूजा व आरती करण्यात आली. कोकण, आंध्र, कर्नाटकासह सांगली, सातारा, कोल्हापूर आदि जिल्ह्यांतून आलेल्या लाखो भाविकांनी माऊलींचे दर्शन घेतले व ते सोहळ्यात सहभागी झाले. 



फलटण तालुक्यात स्वागत

 लोणंद येथील अडीच दिवसांच्या विश्रांतीनंतर दुपारी १ वाजता श्री ज्ञानराजांचा पालखी सोहळ्यातील पहिल्या उभ्या रिंगणासाठी तरडगांवकडे मार्गस्थ झाला. लोणंद व्यापारी पेठ, एस. टी. स्टॅण्ड, अहिल्यादेवी होळकर चौक येथील स्वागत व निरोप स्विकारून सोहळा लोणंद-फलटण मार्गावर आला. दुपारी २.३० वाजता कापडगांव येथे सोहळ्याचे फलटण तालुक्याच्या वतीने प्रांताधिकारी शिवाजी जगताप, तहसिलदार समीर यादव, पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे, गटविकास अधिकारी अमित गावडे यांच्यासह असंख्य ग्रामस्थानीं माऊलींसह सोहळ्याचे स्वागत केले. 


नेत्रदीपक रिंगण सोहळा 

दुपारी दिड वाजता आकाशात मेघ दाटून आले आणि काही वेळातच रिमझीम पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसाने वारकऱ्यांची तारांबळ उडाली. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. या पावसाने वारकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते. 


 उभ्या रिंगणासाठी साडेतीन वाजता माऊलीचा व स्वाराचा अश्‍व चांदोबाचा लिंब येथे दाखल झाले. सायंकाळी ४ वाजता माऊलींचा रथ रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी पोहोचला. श्री स्वामी समर्थ आर्टच्या रांगोळी कलाकार राजश्री जुन्नरकर यांनी सुंदर अशा रांगोळ्याच्या पायघड्या घातल्या होत्या. पहिलाच रिंगण सोहळा असल्याने लाखो भाविकांनी गर्दी केली होती. चोपदार उध्दव यांनी रिंगण लावून घेतले. सायंकाळी सव्वा चार वाजता रिंगणासाठी अश्‍व सोडण्यात आले आणि दोन्ही अश्‍वांनी रथासमोरील २७ तर रथामागील २ दिंड्यांपर्यंत नेत्रदिपक दौड करून लाखो वैष्णवांच्या डोळ्याचे पारणे फेडले. सुरूवातीला स्वाराचा मोती हा अश्व पुढे धावला तर त्यामागे माऊलींचा हिरा हा अश्व धावला. दोन्ही अश्वानी धावत धावत रथाला प्रदक्षिणा मारली. रथाजवळ येवून अश्‍वांनी माऊलींचे दर्शन घेतले. सोहळा प्रमुख ॲड विकास ढगे पाटील यांनी अश्‍वाला प्रसाद दिला. त्यानंतर माऊलीचा अश्‍व पुढे तर स्वाराचा अश्‍व त्याच्या मागे धावत सोहळ्याच्या अग्रभागी जावून पोहोचले. बाळासाहेब चोपदार हे रथाजवळ उभे राहिले. त्यांनी चोप उंचावल्यानंतर तुकाराम तुकाराम नामाचा जयघोष झाला व रिंगण सोहळा पूर्ण केला. या रिंगण सोहळ्यानंतर दिंड्यादिड्यांमध्ये विविध खेळ खेळण्यात आले. 


      सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने वारकऱ्यांच्या खेळात रंगत आली. उभ्या रिंगण सोहळ्याने वारकर्‍यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले . दिंड्यादिंड्यातील विविध खेळानंतर वैष्णवांची पावले तरडगांवच्या दिशेने झेपावली. पालखी सोहळ्यातील हा पहिला उभ्या रिंगणाचा सोहळा पाहण्यासाठी लाखो वैष्णवांसह लोणंद, कापडगाव, चव्हाणवाडी, आरडगांव, पर्‍हार (खुर्द), हिंगणगांव, राहुडी, माळेवाडी, शिंदेमळा आदि गांवातील हजारो भाविक उपस्थित झाले होते. लोणंद ते तरडगांव या वाटचालीत ग्रामपंचायतीचे सरपंच, पदाधिकारी व भाविकांनी माऊलींसह सोहळ्याचे स्वागत करून दर्शन घेतले. तरडगांव येथे नव्याने तयार केलेल्या विस्तीर्ण अशा पालखी तळावर सायंकाळी ६ वा. हा सोहळा पोहोचला. समाज आरतीनंतर सोहळा विसावला. येथे सोहळ्याचा एक दिवस मुक्काम असून उद्या (शुक्रवार) हा सोहळा दोन दिवसांच्या फलटण मुक्कामाकडे मार्गस्थ होईल. पालखी सोहळ्यात सातारा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अजय बंसल यांच्या नेतृत्वाखाली लोणंद ते तरडगाव या मार्गावर वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात आली होती. पालखी मार्गावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies