मुंबई - बिग बी अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या लोकप्रिय कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात अनेकदा महाराष्ट्राशी संबंधित, महाराष्ट्रातील महापुरुष किंवा राजकीय नेत्यांशी संबंधित प्रश्न विचारले जातात.
जनरल नॉलेजचा कस जिथे लागतो आणि पैशांचा
पाऊसही तुमच्या ज्ञानाच्या जोरावर पडतो तो शो म्हणजे कौन बनेगार करोडपती. नुकताच
या शोमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार
यांच्याशी संबंधित प्रश्न विचारला होता. स्वत: सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन हा
अभिमानाचा क्षण असल्याचं म्हटलं आहे.
अमिताभ बच्चन यांनी आपल्या कम्पुटरजींना
नवीन प्रश्नासाठी आदेश दिला अन् स्क्रीनवर शरद पवार यांच्या सासऱ्यांसंदर्भातील
प्रश्न प्रकट झाला. त्यामध्ये, शरद पवारांचे सासरे सदाशिव शिंदे यांच्या क्रिकेट कारकिर्दीचा उल्लेख
होता. खासदार आणि शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी याबाबतचा फोटो शेअर
केला आहे. त्यामध्ये, स्क्रीनवर हा प्रश्न दिसून येतो. भारतासाठी १९४६ आणि १९५२ या
कालावधीत ७ क्रिकेट टेस्ट मॅच खेळणारे सदाशिव शिंदे महाराष्ट्रातील कोणत्या माजी
मुख्यमंत्र्यांचे सासरे होते? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यामध्ये, ४ पर्याय देण्यात आले होते, १. यशवंतराव चव्हाण, २. शरद पवार, ३. विलासराव देशमुख, ४. शंकरराव चव्हाण.
या ४ पर्यायातील दुसरा पर्याय म्हणजे शरद पवार हे उत्तर बरोबर आहे.
सदाशिव शिंदे हे शरद पवारांचे सासरे होते. त्यामुळे, सुप्रिया सुळे यांचे ते आजोबा होते. म्हणून सुप्रिया
सुळेंनी हा फोटो ट्विट करुन, हा अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले. तसेच, हात जोडून आशीर्वादही
त्यांनी मागितला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकाच
व्यासपीठावर आले होते, तेव्हा आमच्या सासरचं
आडनावही शिंदेच आहे, असे शरद पवार म्हणाले होते.