मुंबई, 27 नोव्हेंबर : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे उद्धव ठाकरे यांचा शेतकरी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. काल झालेल्या या मेळाव्याला संबोधित करताना ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर चौफेर टीका केली.
यावेळी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन
तोडण्यावरुन ठाकरे यांनी फडणवीस यांचा जुना व्हिडीओ प्ले करुन त्यांना जनाची नाही
तरी मनाची लाज बाळगा, या शब्दात जोरदार टीका केली होती. उद्धव ठाकरेंनी केलेल्या या
टीकेनंतर आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना
जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार - जुने ऑडिओ ऐकून जर जनाची नाही
आणि मनाची लाज ठेवायची असेल, तर शरद पवारांपासून उद्धव ठाकरेंपर्यंत सर्वांचे जुने व्हिडिओ काढू
आणि सर्वपक्षीय जनाची नाही तर मनाची लाज ठेवावी, असा सांस्कृतिक विभागाच्या
माध्यमातून कार्यक्रम ठेवू, या शब्दात मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका
केली आहे. तुम्हीच जाऊन बांधावर जाऊन सांगितलं होतं, पन्नास हजारांची मदत देऊ, कुठे गेली ती मदत.
तुम्ही सांगितलं होतं, आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी
काँग्रेससोबत कधी संबंध ठेवणार नाही, तुमचाच व्हिडिओ आहे, मग कोणी जनाची नाही तर मनाची ठेवावी.
छगन भुजबळ बद्दल तुम्ही काय म्हणायचे, तुम्ही श्री राम आणि
श्रीकृष्णाला शिव्या देणाऱ्यांसोबत गेले, जनता निवडणुकीत लाज काढतेच, तर वाट पाहू जनता कोणाची लाज
काढते, असे आव्हानही त्यांनी दिले. तसेच ते पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याकडे
खूप गंभीरतेने बघू नये. शिवसेनेतील नेत्यांना ते गटारातील किडे म्हणतात.
मात्र, ते आधी शिवसेनेचे होते ना, शिवसेना काही गटार आहे का, अब्दुल सत्तारांना तुम्हीच
प्रवेश दिला होता. तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले, म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्या
विचारांचा आधार घेऊन ते बाहेर पडले तर ते वाईट आहे का, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
उद्धव ठाकरे अयोध्येच्या राम मंदिरात गेले तर ते चालतं. मात्र, शिंदे गट कामाख्या देवीच्या
मंदिरात गेलं तर ते दुसऱ्या राज्याचे मंदिर झाले असं कसं, असा सवालही त्यांनी केला.
राज्यपालांनी खुलासा केलाय - राज्यपाल महोदयांनी त्यांच्या
विधानाचा खुलासा केला आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा प्रतिक्रिया देणे मला योग्य
वाटत नाही. राज्यपालांनी स्पष्टपणे प्रतिक्रिया दिली आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल
माझ्या मनात अपार आधार आहे. माझ्या त्या भाष्याचे कोणी चुकीचे अर्थ काढू नये.
एवढं स्पष्ट राज्यपाल
बोलल्यानंतर पुन्हा पुन्हा त्यावर चर्चा प्रतिक्रिया योग्य नाही. महाराष्ट्रातील
प्रत्येक व्यक्तीची भावना आहे, जोवर सूर्य, चंद्र आहे, पृथ्वी आहे, तोवर छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आमच्यासाठी प्रेरणादायी
असणार, असेही ते यावेळी म्हणालेमहाराष्ट्राला तिरुपतीमध्ये जागा मिळाली आहे.
तिरूपतीच्या ट्रस्टमध्ये जागा
मिळाली आहे. उद्धव ठाकरेंचे सचिव मिलिंद नार्वेकर त्या ट्रस्टमध्ये आहेत.
महाराष्ट्राला दिल्लीत महाराष्ट्र सदनच्या स्वरूपात जागा मिळाली आहे. आपण जागा
मागितली तर कुठल्याही राज्यात आपल्याला जागा मिळेल.
मात्र, जागा मागितलीच नसेल तर त्या
राज्यामध्ये राज्य कशी मिळेल. मुंबई आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे इतर सर्व राज्य
इथे जागा मागतात. प्रत्येक राज्यात महाराष्ट्र सदन बांधायची यामुळे गरज पडत नाही, कारण महाराष्ट्र प्रगत राज्य
आहे.
महाराष्ट्रातील लोकांना इतर
राज्यात तेवढं काम पडत नाही. मात्र, प्रत्येक राज्याला महाराष्ट्रात
काम पडतं, असेह सुधीर मुनगंटीवार म्हणाले. तसेच देवीच न्याय करत असते आपण
पाहिलंच आहे की आजवर काय काय झालं आहे आणि पुढेही आपण पाहूच जो जैसा करेगा तो वैसा
भरेगा, असा टोमणाही त्यांनी विरोधकांना लगावला. अल्टीमेटम कोणताही राजकीय पक्ष
देऊ शकतो. राजकारणात अल्टिमेटम देणे, प्रत्येकाचा अधिकार आहे, असेही ते संजय राऊत यांच्या
विधानावर म्हणाले.