दुप्पट गाळप क्षमतेने भीमापाटस सुरू होणार : उपमुख्यमंत्री अजित पवार
नीरा: प्रतिनिधी
दौंड तालुक्यातील
भिमापाटस कारखाना शेजारील कर्नाटक राज्यातील कारखानदार चालवण्यास घेत असून त्याची गाळप क्षमता दुपटीने वाढणार सांगत आपल्या राज्यातील लोकांनी साखर कारखाने चालवायला घेतले तर त्याच्यावर टीका होते मात्र तोच कारखाने परराज्यात लोकांनी चालवायला घेतला तर त्याचं कौतुक होतं अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने २५०० टन मे क्षमतेने वाढवलेल्या विस्तारवाढ प्रकल्प व गव्हाणपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुरंदरचे आमदार संजय जगताप होते. यावेळी दिगंबर दुर्गाडे, प्रशांत काटे, बाळासाहेब तावरे, संभाजी होळकर, प्रमोद काकडे, सतीश काकडे, शहाजी काकडे, सचिन सातव, शिवाजी टेंगले, वसंतराव गावडे, माणिकराव झेंडे, उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले, दिवसेंदिवस एफआरपीची किंमत वाढत आहे. त्यानुसार साखरेची किंमत देखील वाढली पाहिजे जागतिक बाजार पेठेत साखरेला चांगला दर आहे त्यामुळे सद्या साखरेला ३६०० रुपये दर मिळण्यास काही हरकत नाही. युक्रेन आणि रशियाचा युद्धाचा पेट्रोल दरवाढीवर परिणाम झाला असला तरी आम्ही गृहिणींसाठी गॅस चा कर १३.५० वरून ३ टक्क्यांवर खाली आणला आहे.
सोमेश्वरच्या कारखाना विस्तारीकरणाबरोबर आता सहवीजनिर्मिती प्रकल्प देखील १८ मॅगावॅट ने वाढवला जाणार आहे. वीज प्रकल्पापेक्षा आता सोलर ची वीज स्वस्त दरात मिळण्यास सुरुवात झाली आहे. रिलायन्स कंपनी आता फार मोठ्या प्रमाणात उतरत असून महावितरण देखील म्हणतंय की आम्हाला २.२५ पैसे युनिटने वीज उपलब्ध होत आहे तर आम्ही तुमची ४.७५ पैसे युनिटने का घेऊ. नुकतीच सुपे येथील जिल्हा बँकेतील अधिकारी मारहाण प्रकरणावर पवार म्हणाले, राग आला म्हणून अधिकारीच ठोकायचा नसतो. आम्हाला पण राग येतो मंग आम्ही काय ठोकतोच का? असा सवाल करून कोणी कायदा हातात घेऊ नका कुठला अधिकारी चुकत असेल तर आम्हाला सांगा. पण एकदम मारामारी करायची काही कारण नाही.
अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप कारखान्याच्या प्रगतीचा आढावा घेताना म्हणाले, सोमेश्वरच्या कायक्षेत्रात अतिरिक्त असलेला ७५ हजार टन ऊस माळेगाव कारखान्याने नेला आहे. याव्यतिरिक्त शेजारील कारखान्यांनी २ लाख ७५ हजार टन ऊस नेला आहे. अजून कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ३ लाखाच्या आसपास ऊस शिल्लक आहे. पूर्वीच्या ५ हजार मेट्रिक टनामध्ये २५०० हजार मेट्रिक टन गाळप क्षमतेची वाढ झाल्याने भविष्यात सोमेश्वर साडेनऊ ते दहा हजार टन प्रतिदिन गाळप क्षमतेने चालणार आहे. कार्यक्रमात आमदार संजय जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल धुमाळ यांनी केले तर उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर यांनी आभार मानले.
---------------
शासकीय पदे भरणार------
पोलीस भरती, जलसंपदा विभाग, वैद्यकीय सेवा, सार्वजनिक आरोग्य अशा विविध पदांची भरती होणार असून मात्र याचे प्रमाण अत्यल्प असणार आहे. सर्वानाच नोकऱ्या नाहीत मिळू शकत त्यामुळे तरुण वर्गाने व्यवसायाला वळण्याचा सल्ला पवार यांनी दिला.
-------------------
या गावांना संधी देणार-------
सोमेश्वर कारखान्याच्या १६८ गावांपैकी जी गाव कारखान्याच्या संचालकपदापासून वंचित राहिली आहेत. अशा गावांना भविष्यात संचालक पदाची संधी देणार आहे. मात्र त्या गावातील मतदानाची आकडेवारी विचारात घेतली जाणार आहे.
-----------------