टी.व्ही.वरच्या मराठी मालिका बघता की नाही? बघा हो, असं काय करता? त्यांच्यासारखं सुंदर जगात दुसरं काहीही नाही. बोट तोंडात घालाल.
'सोनी'वर 'सुंदर माझं
घर' नावाची मालिका होती. (गेली बिचारी!)
त्यात आमचे (म्हणजे जे ढुंकूनही बघत नाहीत असे) संजय मोने यांच्या सुविद्य पत्नी
सुकन्या या प्रमुख भूमिकेत होत्या. मालिकेत रातोरात म्हणजे एका एपिसोडमध्ये
माणसांचे स्वभाव आमूलाग्र बदलतात. हे म्हणजे भूपत डाकूचे सानेगुरुजी किंवा प्रेम
चोप्राचे ए. के. हनगल किंवा अरविंद केजरीवालचे अण्णा हजारे झाल्यासारखे वाटले.
येताजाता उग्र चेहऱ्यानं मिशा फेंदारून डरकाळ्या फोडणारा अण्णा एकाएकी भजी तळायला
बसतो व सुकन्याबरोबर नाचायला लागतो. अत्यंत प्रखर भूमिकेत असलेली उषा नाडकर्णी
एकाएकी मालिकेतूनच गायब होते व मालिका संपली तरी परत येत नाही. खरं काय आपल्याला
कधीच समजणार नाही का? सुकन्याला
विचारावं का? उषा नाडकर्णीऐवजी संजय मोने त्या भूमिकेत
असता तर तो का व कुठे गेला, हा प्रश्न
आम्हा भाबडय़ा प्रेक्षकांना पडला नसता. तो मोने आहे, तो काहीही करील. तो पिठल्यामध्ये आइक्रीम घालून खाईल…
विविध
वाहिन्यांवरील विविध मालिकांत 'कॉमन' असणारी गोष्ट सांगू शकाल? सगळ्या
वाईट असतात ही सर्वज्ञात व सर्वमान्य गोष्ट नका सांगू. प्रत्येक मालिकेत कोणीतरी 'मी फ्रेश होऊन येतो' असं
म्हणतो. 'फ्रेश' व्हायला हे कुठे दमलेले असतात?
'भाग्य दिले तू मला'मध्ये संस्कृती व परंपरा यांचा सतत जप चाललेला असतो. निवेदिता
सराफ (रत्नमाला मोहिते) या संस्कृती व परंपरेच्या चालत्या बोलत्या प्रतीक असतात, पण त्यांच्या घरात सगळे डिशमध्ये व चमच्याने जेवतात. संस्कृती
व परंपरेचं ज्युनियर प्रतीक कावेरी जेव्हा राजवर्धनला केळवण करते तेव्हा ताटात
वरणभाताची मूद बाजूला उपेक्षित पडलेली असते. तिच्यापासून जेवणाला कोणीच सुरुवात
करत नाही. दिग्दर्शकाची संस्कृती व परंपरा अमेझॉनच्या खोऱयातील असू शकतील.
पाळणा
लांबवण्याच्या कलेत पारंगत असलेली माणसंच या मालिका करतात का? किती लांबण किती लांबण! 'राजाराणीची
गं जोडी' ही मालिका म्हणे साडेचार वर्षे चालली
होती. त्यातला अट्टल खलनायक दादासाहेब इंडियन पिनल कोडमधील सगळे गुन्हे ओळीने करीत
सुटलेला असतो. त्याने पहिल्या बायकोला खपवलेलंही असतं. आता दुसरी (आपली राजश्री
हो!) वारंवार येताजाता गळा दाबूनही मरत नाही त्याला बिचारे दादासाहेब काय करणार? ते तोंडानं सतत 'बाबुजी -
बाबुजी' (म्हणजे सुधीर फडके?) असा धावा करीत कृष्णकृत्ये करीत असतात. शेवटी आपल्या सर्व
दुष्कृत्यांची घरच्यांसमोर कबुली देऊन ते घरातून बाहेर पडतात. कुठे रंकाळ्याला भेळ
खायला का? बहुधा लेखक चिन्मय मांडलेकरच्या घरी चहा
प्यायला. तोच त्यांचा खरा बाबुजी. मला सांगा, दत्तक
मुलावर पोटच्या पोरापेक्षा काकणभर जास्तच प्रेम असतं? काय माहीत, कोणाला तरी
दत्तक जाऊन पाहायला पाहिजे. चिन्मयराव घेतील का मला दत्तक?
रेस म्हणजे
जोरात अशी आपली एक पुरातन समजूत आहे. 'जीव माझा
गुंतला'ने ती खोटी पाडल्येय. जास्त 'स्लो' कोण
चालवतोय अशी यातली रिक्षा-शर्यत आहे. मल्हारचा मोडका हात बघून बघून आपल्याला हात
मोडून घ्यायची इच्छा होते. मालिकाभर प्रमाणबद्ध शरीरयष्टी असलेली चित्रा
स्लीव्हलेसमध्ये दाखवल्येय हे चांगलं केलंय. पण हडकुळी श्वेता तिचे काटकीसारखे हात
दाखवत कोणासाठी मिरवत असते? व्हीलचेअर
रस्त्याच्या मधोमध आणून ठेवणे हा आत्महत्येचा नावीन्यपूर्ण मार्ग कळला. रिक्षाचालक
अंतरा निर्जन रस्त्यावरून भाडं स्वीकारते व प्रवाशाला निर्जन रस्त्यावरच सोडते.
दिग्दर्शकाच्या कल्पकतेला दाद देऊया.
इच्छा असून
मी सगळ्या मालिका बघू शकत नाही. एकीकडची मालिका बघत असताना त्याच वेळी दुसरीकडे
चालू असलेली मालिका मी कशी बघणार? माझ्या बचावासाठी
देवाने योजलेला हा प्लॅन आहे.
मालिकेत
कलाकार बदलतात (पहा: 'सुंदरा
मनामध्ये भरली')
तसे प्रेक्षक बदलण्याची कल्पना
कशी वाटते? मालिका दिसणार नाहीत असा टी.व्ही.
बाजारात मिळतो का? मालिका न
पाहण्याची बुद्धी कुठे मिळते?