नाशिक : जिल्ह्याच्या पक्ष नेतृत्व आणि इतर बाबींवर नाराज असलेले, तसेच पत्रकार परिषदेतुन आपली नाराजी उघड करणारे नांदगाव मतदार संघाचे आमदार सुहास कांदे हे आज नाशिकमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात उपस्थित राहतील का?
नाशिकमध्ये शिंदे गटात आग धुमसत असल्याचे समोर
एकीकडे
शिंदे गटाने भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापन केली. मात्र त्यानंतर आता शिंदे गटातच
आलबेल नसल्याचं समोर येत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावरच
प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कारण नाशिकसह औरंगाबाद जिल्ह्यात संजय बांगर, मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून वेळोवेळी बेताल वक्तव्य होत
असल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांना आयत कोलीत मिळालं आहे. तर दुसरीकडे
शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या नाशिकमध्ये शिंदे गटात आग धुमसत असल्याचे समोर आले
आहे. त्यामुळं नवं प्रकरण सुरू होण्याची शक्यता आहे.
कांदेंकडून पत्रकार परिषद घेत रोष व्यक्त
अनेक
दिवसांपासून अनेक कार्यक्रमांपासून लांब असलेले सुहास कांदे यांनी पत्रकार परिषद
घेत आपला रोष माध्यमांसमोर व्यक्त केला. यावेळी त्यांनी जिल्हा नेतृत्वापासून
पदाधिकाऱ्यांपर्यंत अनेकांना धारेवर धरले. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज
नाशिकमध्ये येत असल्याने सुहास कांदे त्या कार्यक्रमात उपस्थित राहणार का? का पुन्हा एकदा मुख्यमंत्री महोदयांना टाळणार हे पहावं लागणार
आहे.
मुख्यमंत्रीच 'या' प्रश्नांवर
तोडगा काढतील का?
नांदगाव
मतदार संघाचे आमदार सुहास कांदे हे उत्तर महाराष्ट्रातून शिंदे गटात गेलेले पहिले
आमदार होते. त्यामुळे त्यांनी पत्रकार परिषदेत देखील एकनाथ संभाजी शिंदे
यांच्यावरील प्रेमापोटी शिंदे गटासोबत असल्याचे ते म्हणाले. नाराज नाही, मात्र संवाद होत नाही, अशी खंतही
त्यांनी बोलून दाखवली. मग नाराज नाहीत कार्यक्रमाला उपस्थिती का नाही? शिंदे गटाचे नाशिकचे कार्यालय माहिती नाही? नाशिकचे पदाधिकारी का मान्य नाहीत? हे सर्व प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. त्यामुळे आता
सर्व प्रशांची उत्तर आज मिळतील का? असाही प्रश्न उभा राहिला आहे. कारण पालकमंत्री यांनी
बोलावलेल्या अनेक बैठकांना सुहास कांदे हे गैरहजर दिसले. त्यांनी पत्रकार परिषदेत
याबाबत खुलासाही केला. मात्र आता मुख्यमंत्रीच या प्रश्नांवर तोडगा काढतील का? सुहास कांदे, दादा भुसे
व हेमंत गोडसे यांच्यात समन्वय घडवून आणतील का? हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.
नेमक पाणी मुरतंय कुठं?
आमदार सुहास कांदे नाशिक
जिल्ह्यातील नांदगाव मतदारसंघाचे आमदार आहेत. छगन भुजबळ यांच्या जिल्हा नियोजन
समितीच्या वादामुळे ते चर्चेत आले. तर दुसरीकडे नाशिकमधून शिंदे गटात जाणारे पहिले
नेते होते. त्यानंतर दादा भुसे, नंतर
खासदार हेमंत गोडसे यांनी शिंदे गटात उडी घेतली. मात्र या सर्वांत दादा भुसे यांना
मंत्री पद मिळालं. यानंतर हेमंत गोडसे यांनी शहरासह जिल्ह्यात अनेकांना शिंदे
गटाची मनसुबदारी सोपवली. त्यामुळे कांदे एकटे पडले. पक्ष निर्णयात मत घेत नसल्याचे, तसेच बैठकांना बोलावले जात नसल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी
केला. यामुळे शिंदे गटात एकच खळबळ उडाल्याने आता शिंदे गटाचे नेतृत्व करणारे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुहास कांदे यांची काय मनधरणी करतात? हे पाहावं लागणार आहे.