नीरा नदिवरील ऐतिहासिक ब्रिटिशकालीन पुलाकडे दुर्लक्ष.
पुलीची दुर्दशा : लोखंडी सळया चोरल्या जात आहेत.
नीरा: १५
पुणे - पंढरपूर पालखी मार्गावरील नीरा (ता.पुरंदर) व लोणंद (ता.खंडाळा) तसेच सातारा - पुणे या दोन जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणाऱ्या नीरा नदीवरील ऐतिहासिक ब्रिटिशकालीन पुलाची दुर्दशा होत चालली आहे. ब्रिटीश कालीन पुलावरील संरक्षक कठड्यांच्या दरम्यान असलेल्या लोखंडी सळई भुरटे चोर तोडून नेत आहेत. काही कठड्यांचे हे नुक्सान करुन त्यातील लोखंडी सळया काढून पूल धोकादायक करण्याचा प्रयत्न चालू आहे. प्रशासनाकडून मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.
आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा या मार्गावरुन जावा म्हणून सन १९२७ साली ब्रिटिश सरकारमध्ये अभियंता असलेल्या व वाल्हा गावचे कृष्णा मांडके यांनी स्वखर्चातून हा पुल बांधला होता. पुर्वी माऊलींचा पालखी सोहळा शिरवळ मार्गे लोणंद मुक्कामी येत असे, ते अंतर अधिकचे व कत्रज घाट अवघड असल्याने दिवे घाट मार्गे सोपानकाकांचे सासवड, महाराष्ट्राचे कुलदैवत खंडेरायाची जेजुरी व महर्षी वाल्मिकी ऋषींचे वाल्हे हा प्रवास योग्य व सुखकर होता. पण आषाढी पालखी सोहळा पावसाळ्यातच असल्याने नीरा नदिला पुर येत असे व जुना दगडी पुल सहज पाण्याखाली जात असे. वीर धरणाच्या निर्मितीनंतर पावसाळ्यात नदीला किती पाणी सोडले जाते हा अंदाज घेऊन हा ब्रिटिश कालीन पुल मांडके अभियंत्यांनी बांधल होता.
नीरा नदि ही पुणे व सातारा जिल्ह्याची सिमाच आहे. नदिच्या एका बाजूला पुणे जिल्हा तर दुसऱ्या बाजूला सातारा जिल्हा हद्द आहे. नीरा (ता.पुरंदर) व लोणंद (ता.खंडाळा) या दोन गावांना जोडणार हा नीरा नदिवरील पुल स्थापत्य कलेचा एक उत्तम नमुना आहे. मागील पावसाळ्यात एका आठवड्यात निरा नदीच्या पात्रातून तब्बल पंधरा टिएमसी पाणी वाहून गेले होते. ते ही तब्बल चाळीस ते पन्नास क्युसेक वेगाने, तरी हा ब्रिटिश कालीन पुल आपली भक्मता दाखवत उभा होता.
आता या ब्रिटिशकलीन पुलाला पर्यायी उंच व रुंद पुल बांधला आहे. त्यामुळे या पुलावरून वाहनांची वाहतूक होत नाही. फक्त पालखी सोहळ्यावेळी माउलींचा रथ या पुलावरून जात असतो. या पुलाचा वापर रोज पहाटे पासून व्यायामासाठी निरेकर करतात. पुलाच्या सळया चोरीचे काम चालू राहिले व नुकसान असेच होत राहिले व त्याकडे आता लक्ष दिले नाही तर हा पूल पुढे धोकादायक होऊ शकतो .
--------------------------------------------------------------
"भंगार चोरीच्या उद्देशाने नीरा नदीवरील जुन्या पुलाचे कठड्याचे गज काढून कठड्याचे अस्तित्व घालवून पूल धोकादायक करण्याचा प्रयत्न चालू आहेत. तरी नीरा व पाडेगावच्या जागृत तरुणांनी व ग्रामस्थांनी याकडे विशेष लक्ष देऊन असे करणारे कोणी आढळून आले तर ते इतरांच्या निदर्शनास आणून द्यावे आपण सगळे मिळून आपला पूल वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे."
किरण खोपडे ( ग्रामस्थ नीरा )
--------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------
पुल कोणाच्या ताब्यात? प्रशासनाला माहीतच नाही.
याबाबत उपकार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणश्रुती नाईक यांच्याशी संपर्क केला असता. या ब्रिटिशकालीन पुलाची देखबाल दुरुस्ती आता कोणाकडे आहे हे सांगता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. पालखी महामार्ग हा नीरा शहरातून न जाता शहराला वळसामारुन पिसुर्टी, जेऊर व बाळु पाटलाचीवाडी (ता.खंडाळा) मार्गे लोणंदला जात आहे. जर आळंदी ते पंढरपूर हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग केला आहे तर पालखी सोहळा ज्या पुलावरून जातोय त्याची देखबाल दुरुस्ती कोण करणार? हा प्रश्न निर्माण होत आहे.