अयोध्या : बहुप्रतिक्षित श्रीराम मंदिर पूर्ण तयार होऊन त्यात २०२४ मधील मकरसंक्रांतीनंतर शुभमुहूर्तावर रामलल्ला विराजमान होतील.
त्यानंतर सर्वांना त्यांचे दर्शन घेता
येईल, अशी माहिती श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त डॉ. अनिल
मिश्र यांनी 'लोकमत'ला दिली. मंदिराच्या पहिल्या मजल्याची उभारणी डिसेंबर २०२३ पर्यंत
पूर्ण होणार आहे. त्यानंतर रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे, असेही त्यांनी
सांगितले.
डॉ. मिश्र यांनी सांगितले की, पहिल्या मजल्यावर १०,६५४ दगडांचा वापर
केला आहे. आणखी ३,००० दगड वापरले जाणार आहेत. गर्भगृहाचे मार्बल पिलर लावणे सुरू झाले
आहे. तीन बाजूंनी ३० मीटर अंतरावर रिटेनिंग वॉलची उभारणी वेगाने सुरू आहे. परिसरात
१६१ फूट विजयपताका लावण्यात येणार आहे. वादळ-वाऱ्यातही ही पताका उभी राहावी, अशी व्यवस्था आहे.
प्रवेशासाठी २ मार्ग
डॉ. अनिल मिश्र यांनी सांगितले की, मंदिर परिसराभोवतीची
चारीही बाजूंची भिंत १८ फूट उंचीची असेल व त्यावर मोठमोठे वॉच टॉवर असतील. लखनौच्या
गव्हर्नर हाऊसमधल्याप्रमाणे या भिंती असतील. या भिंतींच्या बाहेर मानवी तपासणी
करण्यात येईल व आत प्रवेश केल्यावर अत्याधुनिक यंत्रे तपासणी करतील. राममंदिरात
येणाऱ्या भाविकांच्या प्रवेशासाठी दोन प्रमुख मार्ग तयार करण्यात येणार आहेत.
मंदिरावर एकूण पाच शिखरे
गर्भगृहापर्यंत रामलल्लाच्या दर्शनासाठी
भाविकांना १६ फूट चढावे लागेल. मंदिरावर एकूण पाच शिखरे असतील. मंदिरासाठी ३,२०० कोटी रुपयांचा
निधी मिळालेला आहे. अलीकडे दानपत्रांद्वारे दररोज १५ ते २० लाख रुपये मिळत आहेत.
ऑक्टोबर महिन्यात दीपोत्सव कार्यक्रम व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनामुळे
मंदिराला नऊ कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे.
मंदिराच्या परिसरात रात्री
थांबता येणार नाही
या मंदिराच्या परिसरात राहण्यासाठी
कोणत्याही प्रकारची निवासी वसाहत किंवा भवन या प्रकारचे बांधकाम उभारण्यात येणार
नाही. मात्र काही खोल्या विशिष्ट अतिथींना आराम करण्यासाठी उभारण्यात येतील; परंतु तेथे रात्री
थांबण्याची कोणालाही परवानगी दिली जाणार नाही.
·
५० हजार भाविकांसाठी
प्रतीक्षालय उभारण्यात येणार
·
सर्व सोयीसुविधांनी
सज्ज
·
मोठ-मोठ्या धर्मशाळा
उभारणार
·
परदेशी पर्यटकांसाठी
विविध भाषांमधील ऑडिओ-व्हिडीओची व्यवस्था. विविध भाषांच्या माहीतगारांची नियुक्ती
करणार
·
वयोवृद्ध व अशक्त
भाविकांसाठी लिफ्टची सोय केली जाणार
·
मंदिरात भाविकांना
प्रसाद ठेवण्याची परवानगी दिली जाणार नाही परंतु मंदिराकडून भाविकांना प्रसादाचे
वाटप केले जाईल.
·
न्यायालयांत सुरू
असलेल्या विविध खटल्यांचे दस्तऐवज संरक्षित करण्यासाठी त्यांचे डिजिटायझेशन करणार.