Type Here to Get Search Results !

"मुख्यमंत्री झाल्यावर मला वाटलं पद्धतशीर काम होईल, पण उलट झालं; आता व्याप आणखी वाढला"!

  


सुरुवातीला काही पत्रकार म्हणायचे तुम्ही दोघेच (मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री) आहात, तोपर्यंत निर्णय घ्या. दुसरे आल्यानंतर निर्णय घेताना अडचणी येतील.

मग आम्ही निर्णय घेतले की हे दोघेच मंत्रिमंडळ चालवत आहेत, अशा बातम्याही करायचे, अशी मिश्कील टिप्पणी एकनाथ शिंदे यांनी केली. मुख्यमंत्री झाल्यावर मला वाटलं की पद्धतशीर काम होईल, पण उलट झालं. आता व्याप आणखीनच वाढल्याचे ते म्हणाले. चार महिन्यांपूर्वी आम्ही सर्वांना बातमीचा मसाला दिला. ते का घडलं, का केलं हे माहीतच आहे. मी मनात काही ठेवत नसल्याचेही ते म्हणाले.

एकनाथ शिंदे यावेळी बोलताना म्हणाले की, राजकीय मंडळींप्रमाणेच पत्रकारांना कुटुंबाला म्हणावा तितका वेळ देता येत नाही. मीडियात मोठा बदल होत असल्याने पत्रकारांची जबाबदारी वाढलेली आहे. सोशल मीडियाने बातमीची सत्यता पडताळणी हे एक मोठं आव्हान पत्रकारांसमोर उभं आहे. सोर्स वाढल्यानं अशी परिस्थिती उद्भवली आहे. त्यातून मार्ग काढणं गरजेचं आहे, तो तुम्ही काही प्रमाणात काढताना दिसत आहात.

एकनाथ शिंदे वाहतूक समस्येवर भाष्य करताना म्हणाले की, एकदा गावाला निघालो तेव्हा चांदणी चौकात ट्रॅफिक लागलं. काही लोक मला भेटले आणि त्यांनी समस्या सांगितल्या. मग तातडीनं कारवाईचे आदेश दिले, तो पूल जमीनदोस्त केल्याने ट्रॅफिक संपलं. पुणे शहरात देखील अशीच समस्या आहे, तेथील वाहतूक कोंडी संपवायची आहे. मुंबईतही वाहतूक कोंडी होते, त्यामुळे आम्ही मेट्रोला मोठी चालना दिली आहे. मेट्रो सर्वत्र सुरू झाली, की आपोआप मार्गांवर वाहनं कमी होतील.

तुझं माझं जमेना अन् तुझ्याविना करमेना

शिंदे पुढे म्हणाले, प्रत्येक बातमी आमच्याच बाजूने द्या असा आमचा आग्रह नाही. मात्र, चांगलं काम केलं असेल, तर ते द्या. चुका दिसल्यास त्या निदर्शनास येणं गरजेचं आहे. ते काम तुम्ही करता. काहींचा समज-गैरसमजअसतो. प्रत्यक्षात भेटल्यानंतर मनातील अड दूर होते. जे भेटतात त्यांना माझा स्वभाव माहीत आहे. तुम्हीही माझ्या संपर्कात आले की लक्षात येईल. तुझं माझं जमेना अन तुझ्या विना करमेना, असं पत्रकार आणि राजकीय मंडळींचं आहे.

जसं राजकीय नेत्यांमध्ये आलबेल नसतं तसंच पत्रकारांमध्येही नसतं. पण फक्त त्या बातम्या छापून येत नाहीत, अन आमच्या येतात इतकाच फरक आहे. म्हणजे आता मी पत्रकारांच्या बातम्या छापा असं म्हणत नाही. सांगायचं इतकंच की प्रत्येक क्षेत्रात अशी गटबाजी असते.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies