Type Here to Get Search Results !

महाराष्ट्रातल्या राजकारणातील 'भगवं' वादळ... जाणून घ्या बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास

 


मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृतीदिन.

आजच्याच दिवशी म्हणजे 17 नोव्हेंबर 2012 रोजी बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू झाला आणि अवघी मुंबई स्तब्ध झाली. महाराष्ट्राच्या राजकारणातील वादळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंनी राज्याच्या राजकारणाला नवी दिशा दिली. मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारे व्यक्तीमत्व अशी ओळख असलेल्या बाळासाहेबांचा जीवनप्रवासही अनेक वळणं घेणारा होता. व्यंगचित्रकार म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या बाळासाहेबांनी शिवसेना या पक्षाची स्थापना केली.

जाणून घेऊया बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास,

बाळ केशव ठाकरे उर्फ बाळासाहेब ठाकरे या वादळाचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील केशव सिताराम ठाकरे म्हणजे प्रबोधनकार ठाकरे हे समाजसुधारक होते. राजर्षी शाहू महारांजांच्या सोबत त्यांनी समाजसुधारणेचं काम केलं होतं.

1955 साली बाळासाहेबांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरवात एक व्यंगचित्रकार म्हणून केली. इंग्रजी वृत्तपत्र द फ्री प्रेस जर्नलमध्ये ते कार्टून रंगवायचे.

1960 साली बाळासाहेब आणि त्यांचे बंधू श्रीकांत ठाकरे यांनी मार्मिक हे राजकीय व्यंगचित्रण करणारे मासिक सुरू केलं. त्यामाध्यमातून त्यांनी मराठी भाषकांची बाजू धरून गुजराती आणि दक्षिण भारतीयांच्या विरोधात व्यंगचित्राच्या माध्यमातून भाष्य केलं.

19 जून 1966 साली प्रबोधनकार ठाकरे यांच्या आशीर्वादाने बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना या मराठी भाषकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या राजकीय पक्षाची स्थापना केली. मुंबईतील मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारी संघटना अशी या पक्षाची ओळख ठरली.

सुरवातीच्या काळात शिवसेना हा पक्ष कम्युनिस्ट विचारधारेच्या विरोधात कार्य करणारा पक्ष होता. कम्युनिष्ट नेत्यांना शिवसैनिकांनी मारहाण केल्याच्या घटना त्या काळात घडल्या.

शिवसेनेने 1984 साली भाजपसोबत युती केली. त्याच्या पुढच्याच वर्षी शिवसेनेने भाजपच्या मदतीने मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकली.

1989 रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी सामना या वृत्तपत्राची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी मराठी माणसाच्या हिताच्या आणि अधिकाराच्या गोष्टी मांडल्या.

बाळासाहेब ठाकरे यांनी 1992 मध्ये झालेल्या बाबरी मशिदीच्या झालेल्या पाडावाचं समर्थन केलं. बाबरीच्या पतनानंतर मुंबईत बॉंबस्फोट झाले आणि त्यानंतर धार्मिक दंगली उसळल्या. या दंगलीमध्ये शिवसैनिकांचा समावेश होता असा अहवाल श्रीकृष्ण समितीने दिला.

ऐंशीच्या दशकात बाळासाहेबांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली आणि आपल्या पक्षाचा विस्तार वाढवण्याच्या दृष्टीने पाऊलं उचलली. सुरुवातीच्या काळात दक्षिण भारतीयांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या शिवसेनेने नंतरच्या काळात उत्तर भारतीयांच्या विरोधात भूमिका घेतली.

1995 साली शिवसेना भाजप युतीने महाराष्ट्रातील सत्ता काबिज केली. शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्रीपदी बसले.

बाळासाहेबांचा मधला मुलगा बिंदूमाधव ठाकरे यांचं 20 एप्रिल 1996 रोजी मुंबई-नाशिक हायवेवरील एका अपघातात निधन झालं.

1999 साली निवडणूक आयोगाने बाळासाहेब ठाकरे यांना सहा वर्षांसाठी मतदान करण्यावर बंदी घातली.

2004 साली उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. उद्धव ठाकरे यांना फोटोग्राफीचा छंद होता.

2006 साली राज ठाकरे यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. 9 मार्च2006 साली त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली. त्यांनी मराठीचा मुद्दा घेऊन या पक्षाची स्थापना केली.

2009 साली बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली.

मे 2012 मध्ये त्यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं.

15 नोव्हेंबर रोजी बाळासाहेबांना श्वास घेण्यात अडचण येऊ लागली. डॉक्टरांनी त्यांच्या जगण्याची आशा नसल्याचं सांगितलं.

17 नोव्हेंबर 2012 रोजी दुपारी 3.30 मिनिटांनी बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने अवघी मुंबई स्तब्ध झाली.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies